जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : क्रीडा क्षेत्रात करिअरच्या विविध संधी

क्रीडा ज्योत www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

विद्यार्थ्यांसोबतच तरुणपिढीकरिता करिअर विकसित करण्यासाठी विविध क्षेत्रांत अनेक संधी उपलब्ध आहेत. क्रीडा क्षेत्रसुद्धा त्यात मागे नसून, त्यामध्ये करिअर घडविण्याच्या दृष्टीने मोठ्या संधी निर्माण होत आहेत. क्रीडा क्षेत्रात शिस्त व मेहनतीला महत्त्व असल्याने मनात जिद्द व चिकाटी असेल, तर क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडविता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.

विभागीय क्रीडा संकुल येथे राज्य शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित क्रीडा स्पर्धा ज्योत रॅलीच्या उदघाटनाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या कविता राऊत, क्रीडा पुरस्कार विजेते नरेंद्र छाजेड, अविनाश खैरनार, श्रद्धा नालमवार, राजू शिंदे, वीरेंद्रसिंग, हेमंत पाटील, राजेंद्र निंबाळते आदी उपस्थित होते. खेळांच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक स्वाथ्य टिकवण्यास मदत होत असल्याचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी सांगितले. दरम्यान, विभागीय क्रीडा संकुल येथून निघालेली क्रीडा ज्योत रॅली जुना आडगाव नाका-पंचवटी कारंजा- रविवार कारंजा – यशवंत व्यायामशाळा- मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ – केटीएचएम कॉलेज- जुना गंगापूर नाका सिग्नल, कॅनडा कॉर्नर, राजीव गांधी भवन, टिळकवाडी मार्गे, गोल्फ क्लब मैदान (हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान) येथे पोहोचली. त्या ठिकाणी मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते रॅलीत सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करून क्रीडा ज्योत पुणे येथे होणाऱ्या मुख्य महाराष्ट्र ऑलिम्पिक राज्य क्रीडा स्पर्धा 2022 साठी रवाना झाली.

२२ वर्षांनंतर राज्यात मिनी ऑलिम्पिक स्पर्धा
महाराष्ट्र ऑलिम्पिक राज्य क्रीडा स्पर्धा 2022 च्या निमित्ताने आपल्या राज्याला 22 वर्षांनंतर पुन्हा मिनी ऑलिम्पिक स्पर्धा घेण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत जिल्ह्यातील खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले.

हेही वाचा:

The post जिल्हाधिकारी गंगाथरन डी. : क्रीडा क्षेत्रात करिअरच्या विविध संधी appeared first on पुढारी.