धुळे : पोल्ट्री फार्मच्या शेडमधील बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्याच्या सुभाष नगर परिसरात अवैध बनावटी देशी दारू तयार करण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उध्वस्त केला. या कारवाईत एक लाख ५४ हजार रुपये किमतीचे बनावट मद्य आणि मद्य तयार करण्याच्या साहित्यासह चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष नगर परिसरातील बर्फ कारखान्याजवळ असणाऱ्या ताडीच्या शेताच्या बाजूला एका पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये अवैधरित्या बनावट मद्य तयार केले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी उपनिरीक्षक योगेश राऊत तसेच संजय पाटील ,श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने, संदीप सरग ,प्रकाश सोनार ,योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, तुषार पारधी ,विनोद पाठक, योगेश ठाकूर या पथकाला छापा मारण्यासाठी पाठवले यावेळी शेडमध्ये बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची बाब उघडकीस आली. या पथकाने घटनास्थळावरून विनोद रामचंद्र गाबडा, ललित भिकन माळी ,दर्शन संजय चौधरी यांना ताब्यात घेतले असून घटनास्थळावरून 70,560 रुपये किमतीची प्रिन्स देशी दारूचे 21 बॉक्स तसेच 12800 किमतीच्या रिकाम्या बाटल्या आणि तेवढ्याच किमतीचे रसायन यासह मद्य तयार करण्याचे साहित्य असा एक लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दारू तयार करण्याचे शेड हे धीरज कैलास माळी यांच्या मालकीचे असल्याची बाब निदर्शनास आल्याने त्याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post धुळे : पोल्ट्री फार्मच्या शेडमधील बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त appeared first on पुढारी.