Aditya Thackeray : गद्दारांनी हिंमत असेल तर छातीवर वार करावे

Aaditya Thackeray News

नाशिक, सिन्नर : जनता आमच्यासोबत असल्याने महाराष्ट्रात महाविकास आघाडीची ताकद वाढत आहे. गद्दारांनी पाठीत खंजीर खुपसण्यापेक्षा हिंमत असेल तर छातीवर वार करावेत. एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेने अख्खा महाराष्ट्र खड्डयात घातला असल्याची बोचरी टीका करीत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘त्यांनी’ ठाण्यातून आमदारकीचा राजीनामा द्यावा, तिथे मी तुमच्यासमोर लढतो, असे खुले आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथे जनसंवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

यापुढच्या निवडणुकीत गद्दारांना कोणीही निवडून देणार नाही. कारण, गद्दारांचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात महिलांवर अत्याचार वाढले आहेत. उद्योग परराज्यात जात असून तरुण-तरुणींना रोजगार मिळत नाही. महाराष्ट्राचा आवाज कुठेच बुलंद होताना दिसत नाही. मग यांनी गद्दारी करुन कोणासाठी सरकार स्थापन केले, असा रोकडा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून हिवाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेसने विधानसभेच्या पायन्यांवर बसून सरकारचे लक्ष वेधले. पण, त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले आणि शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला. तेच आम्ही ५० खोके देतो म्हटले असते तर ते आम्हाला कडेवर घेऊन पुढे गेले असते, अशी कोपरखळी आदित्य यांनी मारली. हे सरकार जनतेचे ऐकत नाही. फक्त बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर लोकांसाठी काम करीत आहे. त्यामुळे हे अल्पायुषी सरकार कोणत्याही क्षणी कोसळणार असून निवणुकाही लागणार आहेत. हे माझ्याकडून लिहून घ्या, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी मला जातपात दिसत नाही. केवळ आणि केवळ अखंड महाराष्ट्र दिसत असल्याचे नमूद केले व आगामी काळात खंबीर साथ द्यावी. असे उपस्थितांना आवाहन केले.

हेही वाचा :

The post Aditya Thackeray : गद्दारांनी हिंमत असेल तर छातीवर वार करावे appeared first on पुढारी.