नाशिक : अफू, गांजासह अवैध मद्यविक्रीच्या अड्ड्यावर छापा

सिन्नर गांजा www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने मंगळवारी (दि.23) सिन्नर शहरातील कानडी मळा परिसरात नागरी वस्तीत चालवल्या जाणार्‍या अवैध मद्यविक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकली. या कारवाईत अफू, गांजा या प्रतिबंधित पदार्थांबरोबरच देशी-विदेशी मद्याचा साठादेखील हस्तगत करण्यात आला. एक महिला व पुरुष यांना या प्रकरणी अटक करून स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. दरम्यान, पोलिस अधीक्षकांच्या पथकाने परस्पर केलेली कारवाई स्थानिक पोलिसांनही दणका मानली जात आहे.

या कारवाईत सुमारे 34 हजार रुपये किमतीचे देशी-विदेशी मद्य, 35 हजार रुपये किमतीचे अफू व गांजा तसेच महाराष्ट्रात विक्री प्रतिबंधित असलेला गुटखा व पानमसाला आढळून आला. धनश्री रो हाउस येथे घरात हा मुद्देमाल दडवून ठेवण्यात आला होता. गोमाराम तेजाराम चौधरी (29, मूळ रा. राजस्थान) व नंदा धनंजय काळे (33, रा. कानडी मळा, सिन्नर) या दोघांना या प्रकरणी अटक करण्यात आली. सुमारे 82 हजार 605 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. स्थानिक पातळीवर वर्षानुवर्षे स्थानिक पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू असलेले अवैध व्यवसाय अद्यापही बिनबोभाट सुरू असल्याचे या कारवाईने अधोरेखित झाले आहे. बारागाव पिंप्री रोडवरील कानडी मळा येथे असलेल्या धनश्री रो हाउसमध्ये अवैध मद्य तसेच प्रतिबंधात्मक अमली पदार्थांचा साठा असल्याची खबर पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक रमेश पाटील यांच्या नेतृत्वातील विशेष पथकाने कारवाई यशस्वी केली.

पोलिस उपनिरीक्षक पाटील यांच्या विशेष पथकातील पोलिस शिपाई आरती दामले, योगिता काकड, भरत शिंदे, नीलेश अहिरे यांनी ही कारवाई केली. कारवाई यशस्वी झाल्यानंतर सिन्नर पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे, हवालदार नवनाथ पवार, समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, शहाजी शिंदे, आप्पासाहेब काकडे, काशीराम सदगीर आदींनी घटनास्थळी धाव घेत जप्त केलेल्या मुद्देमालाचा पंचनामा करून दोघा संशयितांना ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक सतीश डोले या प्रकरणी तपास करीत आहेत.

स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
ग्रामीण भागात गुन्हेगारी, अवैध व्यवसाय थांबवण्यात स्थानिक पोलिस यंत्रणा कमी पडते की जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामीण पोलिस अधीक्षक उमाप यांच्या आदेशाने जिल्हाभरातील गुन्हेगारी व अवैध धंद्यांचा बिमोड करण्याची मोहीम राबवली जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच पोलिस अधीक्षक कार्यालयाकडून विशेष पथके कार्यान्वित करण्यात आली असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अफू, गांजासह अवैध मद्यविक्रीच्या अड्ड्यावर छापा appeared first on पुढारी.