नाशिक : काँग्रेसला मिळाले नवीन ११ तालुकाध्यक्ष

काँग्रेस पक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच कृषी बाजार समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटन बळकटीला प्राधान्य दिले आहे. त्याअंतर्गत नवीन वर्ष-नवीन पदाधिकारी या संकल्पनेवर आधारित पदाधिकारी नियुक्त केले जात आहे. नवीन वर्षांच्या प्रारंभीच काँग्रेस पक्षाला 11 ठिकाणी नवीन तालुकाध्यक्ष मिळाले आहेत. तर पाच नियुक्त्यांचा प्रश्न थेट प्रदेश पातळीवरून सोडवण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या काँग्रेस तालुकाध्यक्ष निवडीला यंदा मुहूर्त सापडला असून, पक्षाचे प्रदेश निवडणूक अधिकारी पल्लम राजू यांनी तालुकाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. ज्या तालुकाध्यक्षांना पाचपेक्षा जास्त वर्षांचा कार्यकाळ झाला असेल त्यांच्या जागेवर नवीन व्यक्तींना संधी देण्यात आली आहे. तसेच ज्या तालुक्यांमध्ये एकाच व्यक्तीचे नाव एकमताने ठरवण्यात आले, त्यांची निवड झाली. मात्र, ज्या ठिकाणी एकापेक्षा जास्त इच्छुक आणि ज्यांच्या नियुक्तीविषयी पदाधिकार्‍यांच्या तक्रारी आहेत, त्यांची नियुक्ती लांबणीवर पडली आहे. त्यामध्ये बागलाण, मनमाड, नाशिक, कळवण व सुरगाणा या तालुकाध्यक्षांचा समावेश आहे.

दरम्यान, तालुकाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढील महिनाभर सुरू राहणार आहे. त्यानंतर नाशिक शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांच्या बाबतीत निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत दोन्ही पदांसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नूतन तालुकाध्यक्ष

रमेश जाधव (इगतपुरी), प्रकाश पिंगळ (दिंडोरी), संपत सकाळे (त्र्यंबकेश्वर), विनायक सांगळे (सिन्नर), समीर देशमुख (येवला), हरेश्वर सुर्वे (नांदगाव), संजय जाधव (चांदवड), गणपत चौधरी (पेठ), मधुकर शेलार (निफाड), राजेंद्र ठाकरे (मालेगाव), दिनकर निकम (देवळा).

‘आदिवासी’च्या राज्य उपाध्यक्षपदी जाधव

अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसकडून नूतन कार्यकरिणीची निवड करण्यात आली आहे. या कार्यकारिणी राज्य उपाध्यक्षपदी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष लकी जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जाधव यांच्या नियुक्तीचे पत्र आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी दिले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : काँग्रेसला मिळाले नवीन ११ तालुकाध्यक्ष appeared first on पुढारी.