नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा

सायबर गुन्हेगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वर्क फ्रॉम होम, पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने व कुरिअरमध्ये ड्रग्ज सापडल्याचे सांगत गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात सायबर भामट्यांनी शहरातील तिघांना सुमारे १३ लाख ७५ हजार रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी तिघांनी सायबर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तसेच मंजिरी सतीश पाटणकर (रा. पाइपलाइन रोड, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना दि. १५ मे रोजी भामट्यांनी ९ लाख १ हजार ९५० रुपयांचा गंडा घातला. भामट्याने मंजिरी यांना संपर्क साधून कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या नावे पार्सल आले असून, त्यात ड्रग्ज सापडले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून गुन्हा दाखल केला जात असल्याची भीती भामट्याने मंजिरी यांना दाखविली. तसेच वेगवेगळ्या लोकसेवकांची नावे सांगून आणि पोलिस बोलत असल्याचे भासवून मंजिरी यांच्यावर दबाव टाकून त्यांना गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पैशांची मागणी केली. त्यानुसार भीतीपोटी मंजिरी यांनी भामट्याला पैसे दिले. मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंजिरी यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फिर्याद दाखल केली. त्याचप्रमाणे विनय राजेंद्र पाटील (३१, रा. आडगाव) यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने त्यांना पार्टटाइम जॉब देण्याच्या बहाण्याने दि. २७ ते ३१ मे दरम्यान २ लाख ३२ हजार ८६ हजार रुपयांचा गंडा घातला, तर आबेदेन हकीमुद्दीन सैफिन (३८, रा. द्वारका) यांच्या फिर्यादीनुसार, भामट्याने दि. २७ ते २९ जून दरम्यान वर्क फ्रॉम होममार्फत पैसे कमवण्याचे सांगितले. मात्र त्यापोटी भामट्याने आबेदेन यांच्याकडून २ लाख ४० हजार रुपये घेत गंडा घातला. या तीनही गुन्ह्यांचा तपास सायबर पोलिस करीत आहेत.

याआधीही रोजगार देण्याच्या बहाण्याने सायबर भामट्यांनी शहरातील नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. मात्र तक्रारी वेळेत न आल्याने पोलिसांना पैसे परत मिळवण्यात अडचणी येत असल्याचे चित्र आहे. तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील संदेश, प्रलोभनांना बळी पडून पैसे देऊ नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक क्राईम : सायबर भामट्यांकडून शहरातील तिघांना १३ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.