नाशिक : जिल्ह्यातील विधवांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

mahila www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक येथे विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अभियानाचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयामुळे जिल्ह्यातील विधवा महिलांना त्यांचे प्रश्न व समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. दरम्यान, झिंजाडे यांनी सुरू केलेल्या विधवा सन्मान व संरक्षण अभियानाची दखल नागपूर हिवाळी अधिवेशनात घेण्यात आली.

विधान परिषद सदस्य आमदार रामराव पाटील यांनी या संदर्भात सभागृहात लक्षवेधी मांडली. शेतकरी आत्महत्या व कोविड काळात अनेक महिलांच्या वाट्याला वैधव्य आले. पतीच्या निधनानंतर पत्नीचे कुंकू, बांगड्या, जोडवे, मंगळसूत्रासारखे स्त्रीधन काढून टाकणे त्यानंतर सासरी संपत्तीत वाटा न मिळणे, हळदीकुंकू, लग्नकार्यसारख्या कार्यक्रमात समाजात, नातेवाइकांमध्ये सन्मान न मिळणे यासाठी या अभियानाची सुरुवात प्रमोद झिंजाडे यांनी केली. त्याला विरोध म्हणून राज्यातील 27,906 ग्रामपंचायतींपैकी कोल्हापूर येथील हिरवाड या गावाने ग्रामसभेत विधवा महिला सन्मान व संरक्षण ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवला. त्याची दखल म्हणून हिरवाड पॅटर्न शासनाने महाराष्ट्रभर राबवावा व गरज पडल्यास कायदा करून ही प्रथा बंद करावी, अशा आशयाचे मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत अनुकूलता दर्शविली. नाशिक येथील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जिल्ह्यातील तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व विधवा महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. शहरातील विधवा सन्मान व संरक्षण कायदा अभियान समितीचे पदाधिकारी राजू शिरसाठ, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, शोभा काळे यांनी स्वागत केले. दरम्यान, अशा प्रकारचे कार्यालय प्रथमच सुरू झाल्याने महिला वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्ह्यातील विधवांना मिळाले हक्काचे व्यासपीठ appeared first on पुढारी.