नाशिक : झोडगे गावात पेट्रोलपंपावर अज्ञातांकडून गोळीबार

Unidentified persons fired at a petrol pump in Zodge village

मालेगाव, पुढारी वृत्तसेवा : मालेगाव तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील झोडगे गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.25) रात्री उशिरा घडली. या घटनेने झोडगे गावामध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महामार्गावरील पेट्रोलपंप आणि हॉटेल चालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यावेळी पोलिसांनी महामार्गावर गस्त वाढवून गुन्हेगारांचा अटकाव करावा. अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.

झोडगे गावामध्ये कृष्णा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर शनिवारी रात्री दोन अनोळखी तरुण विना नंबरप्लेट असलेल्या दुचाकीवरून आले. यातील एका तरुणाने पेट्रोल पंपावरील कर्मचारी राजेंद्र पाटकर (रा. आर्वी, जि.धुळे) यास शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी दुसरे कर्मचारी भरत बच्छाव (रा. भिलकोट) हे धावून गेले असता संशयित तरुणाने खिशातून बंदूक काढून दोनवेळा हवेत गोळीबार केला.

त्यामुळे पेट्रोलपंप परिसरात पळापळ झाली. त्यातच संशयित तरुणांनी भरत यांच्या खिशातील सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन काढून घेतला आणि धुळेच्या दिशेने पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधिक्षक अनिकेत भारती यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरून नेलेला मोबाईल फोन महामार्गवर पुढे सापडला. हा सगळा घटनाक्रम पेट्रोलपंपवरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून पोलिसांनी तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. भरत बच्छाव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात दोन संशयिताविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :