नाशिक : दोन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हवालदारावर कारवाई

  • Post author:
  • Post category:Uncategorized
लाचखोर

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : तक्रारदार यांच्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार न घेता तडजोड करुन न्यायालय आवारात दोन हजार रुपयांची लाच घेताना पवारवाडी पोलीस ठाण्याचे हवालदार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या रंगेहाथ जाळ्यात. दिलीप निकम (57, रा. साकोरा ता. नांदगाव) असे कारवाई करण्यात आलेल्या कर्मचारीचे नाव आहे.

तक्रारदार हे शेती खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी मित्र अल्ताफ यास त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी हातउसणे म्हणून दोन महिन्यांच्या बोलीवर 50 हजार रुपये दिले होते. परंतु दोन महिने पुर्ण होवूनही तक्रारदार यांचा मित्र अल्ताफ हा मागणी करुन ही पैसे देत नसल्याने त्यांच्यात भांडण झाले. त्यामुळे अल्ताफ हा मंगळवारी (दि.23) रोजी पवारवाडी पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेला होता. यावेळी पोलीस हवालदार निकम यांनी तक्रारदार यांना फोन करुन पोलिस ठाण्यात बोलाविले. तक्रारदार यांनी त्यांचे दाजी यांना पोलीस हवालदार निकम यांना भेटण्यास पाठविले. यावेळी पोलीस हवालदार निकम यांनी अल्ताफ याची तक्रार न घेता तडजोड करून देण्याच्या बदल्यात पाच हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार, त्याचे दाजी व पंच साक्षीदार यांच्या समक्ष पो. हवालदार निकम यांनी पाच हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार निकम यांनी बुधवारी (दि.24) तक्रारदाराकडून न्यायालय आवारात स्वीकारले. निकम यांनी तीन हजारपैकी एक हजार रुपये तक्रदार यांना परत करत दोन हजार रुपये लाच म्हणून स्विकारत असतानाच लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. निकम यांच्या विरुध्द छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक चौधरी, पोलीस शिपाई अनिल गंगोडे, हवालदार पंकज पळशीकर, विनोद पवार यांनी ही कारवाई केली.