Nashik : दिंडोरीत “उत्कर्ष’ की “परिवर्तन’ याकडे लक्ष

बाजार समितीचा आखाडा akhada www.pudhari.news

दिंडोरी (जि. नाशिक) : समाधान पाटील

येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडून दोन गट आमने-सामने आले आहेत. तसे शिवसेना भाजपलाही फुटीचा सामना करावा लागत आहे. त्यांच्याही दोन्ही पॅनलमध्ये फाटाफूट झाल्याने निवडणुकीत चांगलीच चुरस पाहावयास मिळत आहे.

यंदा प्रथमच विद्यमान सभापती तथा माजी मविप्र सदस्य दत्तात्रय पाटील यांना स्वकीयांसोबतच विरोधकांचा सामना करावा लागत आहे. पाटील व मविप्र सदस्य प्रवीण जाधव यांचे शेतकरी उत्कर्ष पॅनलपुढे विरोधी परिवर्तन पॅनलने मोठे आव्हान उभे केले आहे. हे आव्हान शेतकरी उत्कर्ष पॅनल पेलणार की, परिवर्तन होणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

दिंडोरी बाजार समितीमध्ये सातत्याने काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. संस्थापक चेअरमन गणपतराव पाटील व त्यानंतर दत्तात्रय पाटील यांच्याकडे बाजार समितीची धुरा राहिली आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना भाजप युतीने सातत्याने लढा दिला. मात्र, त्यांना यश आले नाही. गेल्यावेळी निवडणूक बिनविरोध झाली होती. यंदा मविप्र निवडणुकीने दिंडोरीच्या राजकारणाचे सारे चित्रच बदलवले असून, मविप्र निवडणुकीत नीलिमा पवार यांनी दत्तात्रय पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर पाटील यांनी विरोधी गटाला केलेली मदत पाटील यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना उभारी देणारी ठरली आहे. तेव्हापासून अंतर्गत विरोधकांनी पाटील यांच्या विरोधात पॅनल करण्याची तयारी केली. दिंडोरीचे माजी नगराध्यक्ष कैलास मवाळ, अविनाश जाधव, प्रशांत कड, गंगाधर निखाडे यांनी वर्षभरापासून पॅनलनिर्मितीचे प्रयत्न केले. कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी दोन्ही गटांनी एकत्रित येत निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांचे एकमत होऊ शकले नाही. पाटील यांनी शिवसेनेचे नेते प्रवीण जाधव, विलास निरगुडे, भाजपचे शिवाजी पिंगळ, श्याम बोडके, काँग्रेसचे गुलाब जाधव यांना सोबत घेत शेतकरी उत्कर्ष पॅनल स्थापन केला आहे. तर कैलास मवाळ, अविनाश जाधव, प्रशांत कड, गंगाधर निखाडे यांनी भाजपचे नरेंद्र जाधव, योगेश बर्डे आदींना पॅनलमध्ये घेत माजी आ. रामदास चारोस्कर, ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील, सुरेश डोखळे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊलाल तांबडे, सुनील पाटील, प्रकाश शिंदे, कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी आदींना घेत परिवर्तन पॅनल उभे करत सत्ताधारी पाटील गटापुढे आव्हान उभे केले आहे.

दोन्ही पॅनलने प्रचार-पत्रकावर राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे फोटो टाकत प्रचार सुरू केला आहे. यंदा प्रथमच पक्षीयऐवजी सर्वपक्षीय गट-तटात निवडणूक होत आहे. माजी आमदार धनराज महाले यांनी गटबाजीच्या राजकारणात न पडता तटस्थची भूमिका घेतली आहे. दोन्ही पॅनलने वणीत प्रचाराचा शुभारंभ करत बाजार समितीत आपणच शेतकरी हिताचे काम करत असल्याचा दावा केला आहे.

श्रीराम शेटे, नरहरी झिरवाळ यांची अडचण

राष्ट्रवादीतील गटबाजी रोखण्यात अखेरपर्यंत प्रयत्न करूनही राष्ट्रवादीचे नेते श्रीराम शेटे यांना यश आले नाही. दोन्ही गट निवडणूक लढविण्यावर ठाम राहत दोघांनीही इतर पक्षांतील नेत्यांना सोबत घेत पॅनल उभे केले. दोन्ही पॅनलमध्ये सर्वाधिक उमेदवार हे राष्ट्रवादीचे असल्याने कुणाचा प्रचार करायचा हा पेच शेटे, झिरवाळ यांच्यापुढे उभा राहिला आहे. त्यामुळे हे दोघे अद्याप कुणाच्याही प्रचारात सक्रिय नाहीत.

दोन मित्रांमध्ये वितुष्ट

दिंडोरीच्या राजकारणात गणपतराव पाटील व दत्तात्रय पाटील यांना दो हंसो की जोडी म्हटले जात होते. एक जण जिल्हा बँक तर एक जण बाजार समिती असे प्रतिनिधित्व करत होते. मविप्र निवडणुकीत दोघांनीही प्रथमच तालुक्यात वेगळी भूमिका घेतली होती. मात्र, बाजार समिती निवडणुकीत दोघांनी एकमेकांविरोधात उमेदवारी केली आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : दिंडोरीत "उत्कर्ष' की "परिवर्तन' याकडे लक्ष appeared first on पुढारी.