
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणाऱ्या सफाई कामगारांना लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने वारसा हक्काने नियुक्ती देण्याबाबत सुधारित तरतुदी लागू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत वारसा हक्क संघटनेच्या समन्वय समितीतर्फे बुधवारी (दि.८) महापालिकेसमोर ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला.
अनुसूचित जाती व नवबौध्द वर्ग, सफाई कामगारांच्या व्याख्येत बसणारे सर्व सफाई कामगार, पूर्वी ज्या सफाई कामगारांनी डोक्यावरून मैला वाहून नेण्याचे काम केले, अशा सर्व सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरीत प्राधान्य देण्याचा राज्य शासनाने गेल्या २४ फेब्रुवारी रोजी निर्णय घेतला. शासकीय-निशासकीय, महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषदा, कटक मंडळे, राज्य शासनाची महामंडळे, स्वायत्त संस्था, अनुदानित संस्था, शासकीय रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये, पशुवैद्यकीय महाविद्यालये अशा आस्थापनांमधील सफाई कामगारांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर, मृत्यूनंतर, स्वेच्छानिवृत्तीनंतर किंवा त्यांना वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरविल्यानंतर सफाई कामगारांचे आर्थिक नुकसान होऊ नये व त्यांचे कुटुंब बेघर होऊ नये, यासाठी लाड समितीच्या शिफारशीनुसार संबंधित सफाई कामगारांच्या जागी त्यांच्या वारसाची नियमानुसार वारसा हक्काने नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश राज्य शासनाने संबंधित आस्थापनांना दिले आहेत. अशा स्वरूपाच्या सुधारित तरतुदींचे पालन व्हावे, अशी अनेक वर्षांपासून सफाई कामगारांची मागणी होती. राज्य शासनाने शासन आदेश जारी करून या सुधारित तरतुदी मंजूर केल्याने त्यानिमित्त समन्वय समिती वारसा हक्क संघटनेचे अध्यक्ष केतन मोहोळ, आदित्य नलवडे यांच्या नेतृत्वाखाली मनपासमोर जल्लोष करण्यात आला.
हेही वाचा :
- Sanjay Raut : नागालँडमध्ये यापूर्वीही एकत्रित सरकारचा प्रयोग- खासदार संजय राऊत
- नगर : 4478 हेक्टरला अवकाळीचा फटका
- Geyser Gas Leak : गॅस गिझर लिक झाल्यामुळे नवविवाहित जोडप्याचा गुदमरून मृत्यू
The post नाशिक : मनपाच्या सफाई कामगारांचा जल्लोष appeared first on पुढारी.