नाशिक : महिला दिनानिमित्त शहरात आज विविध कार्यक्रम

महिला दिन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जागतिक महिला दिन आज (दि.8) साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाशिकमध्ये महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिखर स्वामिनी बहुउद्देशीय महिला संस्था व निर्मल गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 6 ला गोदाघाटावर गोदावरीची महाआरती आयोजित करण्यात आली आहे.

काँग्रेस शहर महिला आघाडीतर्फे कर्तृत्ववान महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेकडून दिवसभर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, महिला बाइक रॅली, फिटनेस कार्यक्रम व पारितोषिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. राजीवनगर येथील युनिक ग्रुप व ग्रीनफिल्ड ग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी 6 ला युनिक मैदानावर महिलांसाठी स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहेत. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समितीतर्फे जिल्हा रुग्णालयापासून सकाळी 8 ला ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ रॅली काढण्यात येईल. ही रॅली जिल्हा रुग्णालय, त्र्यंबक नाका, जुने सीबीएस, शालिमारमार्गे आयएमए हॉल येथे समारोप होईल. याशिवाय महिला दिनानिमित्ताने विविध शहर परिसरातील संस्थांनी महिलांसाठी खास सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धा तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन केलेले आहे. रोटरी क्लबतर्फे जागर सेवेचा अंतर्गत पद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्य यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, रोटरी क्लब हॉल (गंजमाळ) येथे सायंकाळी 5.30 ला हा कार्यक्रम होईल.

हेही वाचा:

The post नाशिक : महिला दिनानिमित्त शहरात आज विविध कार्यक्रम appeared first on पुढारी.