नाशिक : माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघांवर जिवेघेणा हल्ला

नाशिक

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा : नाशिक रोड पुर्व भागातील खर्जुल मळा मधील मोरया पार्क येथे माजी नगरसेविका व पतीसह तिघांवर जिवेघेणा हल्ला झाला. माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल व किरण खर्जुल यांच्यासह अजून दोन जणांवर धारधार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. या घटनेमुळे नाशिकरोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

खर्जुल मळा येथे वाढदिवस कार्यक्रम

या बाबत माहिती अशी की, खर्जुल मळा येथील मोरया पार्क येथील संदीप गाढवे यांच्या मुलाचा सोमवारी वाढदिवस असल्याने रात्री घरासमोर छोट्याश्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाचा केक कापल्यानंतर सुरू असलेला आवाज कमी करा, गर्दी-गोंधळ करू नका असे किरण खर्जुल यांनी सांगितले. वाढदिवस साजरा केल्यानंतर सर्वजण घरी निघून गेले.

किरण खर्जुल व नितीन खर्जुल यांच्यावर हल्ला 

रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास किरण दिनकर खर्जुल हे घराजवळ चक्कर मारत होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तीन- चार जणांनी काही एक विचार न करता किरण यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला चढविला. यामुळे जोरदार आवाज झाल्याने घरात असलेले शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन गोपाळ खर्जुल, किरणचा भाऊ दीपक हे घराबाहेर येऊन त्यांनी मारामारी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये नितीन यांच्या देखील पोटाच्या दोन्ही बाजूला वार झाले. तसेच मदतीसाठी आलेल्या दीपक व योगेश खर्जुल यांच्यावर देखील वार झाले. या हल्ल्यात किरण हा गंभीर जखमी झाला आहे. चौघा जणांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले. चौघा जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच जयराम हॉस्पिटल बाहेर खर्जुल यांच्या समर्थकांनी एकच गर्दी केली होती.

पोलीस कर्मचारी घटनास्थळावर दाखल

या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांसह पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. जखमींना उपचारासाठी नाशिक रोड मधील जयराम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आले. काही वेळातच जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित आरोपींना नाशिक रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जखमी नितीन खर्जुल हे माजी नगरसेविका पती असून बांधकाम व्यवसायिक किरण खर्जुल हे देखील गंभीर जखमी झाले आहे.

माजी नगरसेविकाच्या पतीवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ

माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती नितीन खर्जुल व किरण खर्जुल यांच्यासह अजून दोन जणांवर चॉपरने वार करण्यात आले आहेत. माजी नगरसेविकाच्या पतीवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणातील गुन्हेगारांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खर्जुल यांच्या समर्थक करीत आहेत.