नाशिक : मुलीच्या लग्नात आंदण म्हणून फळझाडांची रोपे; शेतकरी पित्याचा वेगळा विचार

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक)  : पुढारी वृत्तसेवा

सध्या लग्नाच्या धामधुमीचा महिना सुरु आहे. गावोगावी हे आनंद सोहळे सुरु आहेत. आपल्या मुलीच्या लग्नात एका शेतकरी पित्याने वेगळा विचार केला, आपण मुलीच्या संसारासाठी विविध वस्तू भेट देतो. परंतु चिरकाल टिकणारी, अनेक पिढ्यांना लाभ होणारी अशी शाश्वत एखादी वस्तू भेट दिली पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या मुलीला तीस विविध फळांची रोपे भेट दिली. या अभिनव कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

निफाड तालुक्यातील वडाळी नजीक गावातील मनीषा अरुण मोगरे हिचा विवाह दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील गोविंद रामराव ढेपले यांच्याशी कसबे सुकेणे येथे (दि. १२)  झाला. याप्रसंगी वधू पिता व माता संगीता अरुण मोगरे यांच्याकडून आपल्या मुलीला फळझाडाची रोपे आंदण देण्यात आली. यात आंबा, चिंच, पेरू, रामफळ, सीताफळ, जांभूळ, नारळ आदि फळ रोपे आहेत. ह्या अभिनव उपक्रमातून वृक्षरोपणाचे महत्व मोठ्या प्रमाणात घडून येण्यास निश्चित लाभ होणार आहे. या उपक्रमाप्रसंगी वधू-वरासोबत क.का.वाघ पिंपळगाव बसवंत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आणि एक मुल तीस झाडे, निसर्ग शाळेचे संस्थापक सदस्य डॉ. ज्ञानोबा ढगे, प्रा. नारायण शिंदे, प्रा. हेमंत पाटील, वर पिता व माता इंदुबाई रामराव ढेपले, सागर ढेपले, राजाराम आहेर, रामनाथ चोपडे आदि उपस्थित होते.

“आम्ही पिंपळगाव बसवंत येथील क. का.वाघ महाविद्यालयात शिकत असताना राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक होतो. या काळात आम्ही एक मुल तीस झाडे अभियान, रविवार एक तास झाडांसाठी, घरच्या घरी रोपवाटिका घरोघरी रोपवाटिका आदी पर्यावरण पूरक उपक्रमात सक्रीय सह्भाग घेतला आहे. ही आगळी वेगळी भेट आम्हाला आवडली असून आम्ही या तीस झाडांची लागवड करून त्याची जोपासना करणार आहोत.”   मनीषा आणि गोविंद, वधू-वर

 

“एक मुल तीस झाडे अभियानविषयी प्रा. डॉ. ज्ञानोबा ढगे, अण्णासाहेब जगताप यांच्यामुळे माहिती झाली. यातून पर्यावरण विषयक काम करण्याची आवड निर्माण झालेली आहे. अश्या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाबरोबरच या फळझाडांच्या संगोपनातून शेतकऱ्याला आर्थिक लाभ देखील होणार आहे.

  – अरुण मोगरे , वधू पिता

 

हेही वाचा :

The post नाशिक : मुलीच्या लग्नात आंदण म्हणून फळझाडांची रोपे; शेतकरी पित्याचा वेगळा विचार appeared first on पुढारी.