नाशिक : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी डॉ. हिरे यांची नियुक्ती

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : भाजपला सोडचिट्टी देऊन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात सहभागी झालेल्या डॉ. अद्वय हिरे यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाली आहे. पक्षाचे सचिव खासदार संजय राऊत यांनी सायंकाळी ट्वीट करत डॉ. हिरे यांच्या संघटन कौशल्याचा शिवसेना वाढीस नक्कीच फायदा होईल, असा विश्‍वास वर्तविला.

दरम्यान, येत्या २६ तारखेला मालेगावच्या कॉलेज ग्राऊंडवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना महामेळावा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर महाराष्ट्र नेते डॉ. हिरे यांनी ‘मातोश्री’वर ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रण दिले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी डॉ. अद्वय हिरे यांच्या नियुक्तीबाबत पक्षाचे सचिव खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. याप्रसंगी खासदार संजय राऊत, विनायक राऊत, माजीमंत्री सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते आंबदास दानवे, आमदार भास्करराव जाधव, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, सहनेते सुनील बागुल, सुधाकर बडगुजर, सुरेश पवार, पवन ठाकरे आदी उपस्थित होते. सभेस खासदार राऊत, महिला नेत्या सुषमा अंधारे, खासदार विनायक राऊत, माजी मंत्री देसाई, विरोधी पक्षनेते दानवे, आमदार जाधव आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. महामेळाव्याच्या तयारीसह नियोजनावर यावेळी चर्चा करण्यात आली.

हेही वाचा

The post नाशिक : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी डॉ. हिरे यांची नियुक्ती appeared first on पुढारी.