नाशिक : 21 सेंच्युरीमध्ये शिक्षक गिरविणार संगणकाचे धडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील आठ जिल्ह्यांमधील शासकीय प्राथमिक शाळांमध्ये ‘प्रमोटिंग कॉम्प्युटर सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड 21 सेंच्युरी स्किल’ (मेझॉन – एलएफई) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी यांनी केले आहे.

याबाबत नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. या उपक्रमात शिक्षकांच्या कामाचे मूल्यांकन होऊन त्यानुसार गुणवत्ताक्रम ठरविला जाईल आणि त्यातील टॉपर शिक्षकांना संगणक लॅब पुरविण्यात येणार आहे. या लॅबच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याबाबत नियोजन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये नमूद केल्याप्रमाणे शालेय शिक्षणात संगणकीय विचार आणि समस्या निराकरणासारखे भविष्यवेधी कौशल्यांवर भर देणे गरजेचे आहे. या अनुषंगाने राज्यस्तरावर या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. याअंतर्गत किमान 21 लाख विद्यार्थी व पाच हजार शिक्षकांना संगणकीय ज्ञान व कॉम्प्युटर सायन्समधील विविध संकल्पना शिकण्याची संधी प्राप्त करून देण्यात आली आहे. याकरिता यंदा राज्यातील पुणे, नागपूर, नाशिक, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नगर आणि छत्रपती संभाजीनगर या नऊ जिल्ह्यांची निवड प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आली आहे. या जिल्ह्यांतील शिक्षकांना ऑनलाइन कोर्सद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याच्या पुढील टप्प्यात मुलांसाठी कॉम्प्युटर लॅब्स, लॅपटॉप, टॅबलेट्स अशा भौतिक सुविधा पुरविल्या जाणार आहेत.

खास शिक्षकांसाठीच अभ्यासक्रम
एलफई सीएस टीचिंग एक्सेलन्स अंतर्गत आयसीटीसी हा कोर्स शिक्षकांसाठी तयार करण्यात आला आहे. इयत्ता पहिली ते आठवीला शिकविणारे जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका शाळेतील मराठी माध्यमाचे शिक्षक या कोर्समध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. सर्वोत्तम सहभाग व कामगिरी करणार्‍या शिक्षकांना विशिष्ट पारितोषिक देऊन सन्मानित केले जाणार आहे. तसेच शाळेसाठी संपूर्ण कॉम्प्युटर लॅब सेटअप, लॅपटॉप किंवा टॅब्लेट देण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : 21 सेंच्युरीमध्ये शिक्षक गिरविणार संगणकाचे धडे appeared first on पुढारी.