प्रत्येक मतदाराने मतदान करुन धुळे जिल्ह्याच्या नावे विक्रमाची नोंद करावी : पालकमंत्री गिरीश महाजन

धुळे ; पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आपल्या धुळे जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने मतदान करून जिल्ह्याच्या नावे सर्वाधिक मतदानाच्या विक्रमाची नोंद करावी, असे आवाहन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाराष्ट्र राज्याच्या 65 व्या स्थापना दिनानिमित्त येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना शुभेच्छा देताना ते बोलत होते.

पालकमंत्री महाजन आपल्या शुभेच्छा संदेशात बोलताना, महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची, हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिराव फुले यांची, आद्य स्त्री शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची, समतेचे प्रणेते राजर्षि शाहू महाराज यांची, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह अनेक ज्ञात-अज्ञात संत, समाजसुधारक, क्रांतिकारकांची भूमी आहे. याच महाराष्ट्रातील शूरवीरांनी आपल्या पराक्रमाच्या गाथा थेट अटकेपार लिहिल्या. अशा या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेतकरी, कामगारांनी आपले रक्त सांडले. त्यांच्या स्मृतीचे मुंबईतील हुतात्मा स्मारक याची साक्ष आहे.
18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या धुळे मतदारसंघाकरीता 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. खरं म्हणजे निवडणुका ह्या आपल्या लोकशाहीचा महोत्सवच आहे. या महोत्सवात जिल्ह्यातील प्रत्येक पात्र मतदाराने आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे ते म्‍हणाले.

सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तापमानाचा पारा वाढत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी आपल्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे. मागील वर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी होते. आधीच कमी पाऊस त्यात ऊन्हाचा वाढता पारा याचा जलसाठ्यांवर परिणाम होत आहे. जलसाठे दिवसेंदिवस कमी होत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरीकाने पाण्याचा थेंब अन थेंब वाचविला पाहिजे. प्रत्येक नागरीकाने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही पालकमंत्री महाजन यांनी केले.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर जिल्हा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमाक 6, धुळे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळे जिल्हा पोलीस दल ( पुरुष), धुळे जिल्हा पोलीस दल (महिला), पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे, होमगार्ड, श्वान पथक, फॉरेन्सिक व्हॅन, चलचित्र वाहन, वैद्यकीय पथक आदी पथकांचे संचलन झाले. संचलनाचे नेतृत्व पोलीस निरिक्षक मुकेश माहूले यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकाशवाणीच्या पुनम बेडसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सोनवणे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

येथील जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याला निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे, संदीप पाटील, सीमा अहिरे, संजय बागडे, तहसिलदार (महसुल) पंकज पाटील आदी उपस्थित होते.

आदर्श तलाठी पुरस्कराचे वितरण

यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्याबद्दल आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त वाघाडी, ता. शिरपूर येथील तलाठी रिझवान खान यांना प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक नवले, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी महेश जमदाडे, नितीन मुंडावरे, संदीप पाटील, सीमा अहिरे, संजय बागडे, सहायक पोलीस अधिक्षक एस. ऋषिकेश रेड्डी, मनपा अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, उपायुक्त संगीता नांदुरकर, तहसिलदार अरुन शेवाळे, तहसिलदार (महसुल) पंकज पवार, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :