मनमाड(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- शहर परिसरासह ग्रामीण भागात बुधवारी (दि.५) मान्सूनपूर्व पावसाचे दमदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह सुमारे पाऊण तास जोरदार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. या जलधारांमुळे तापमानात घट होऊन दोन महिन्यांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आता समाधानकारक मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गेल्या चार दिवसांपासून शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाचा चटका कमी झाला, मात्र उष्मा वाढला होता. त्यातून बुधवारी चारनंतर मान्सूनपूर्व पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यानंतर पावसाचा जोर वाढून सुमारे पाऊण तास मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाने शहर परिसरासोबत ग्रामीण भागाला झोडपून काढले. वादळी वाऱ्यात काही घरांचे पत्रे उडून गेले. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
तापमानात घट झाल्याने दिलासा
पावसामुळे ४१ अंशांपर्यंत गेलेले तापमान थेट ३५ अंशांवर आले. तापमान घटल्याने उकाड्याने हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने आजघडीला तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शहरापासून गाव, खेडे आणि वाड्या-वस्त्यांवर पाणी टँकर धावत आहेत. यंदा वेळेवर सलग आणि दमदार पाऊस होऊन दुष्काळाचे ढग हटावेत, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.
हेही वाचा –