महामानवांचे चरित्र अनेकानेक नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांनी भरलेले असते. ते वाचताना, समजून घेताना आपण मंत्रमुग्ध होतो. मात्र, तरीही त्यापैकी एखादी घटना अशी विलक्षण असते की, जिच्यामुळे त्या महानायकाच्या अवघ्या आयुष्यालाच कलाटणी मिळते. त्या स्थळापाशी आपण पोहोचलो की, अगदी विस्मयचकित होऊन जातो. प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रातही असे एक स्थळ आहे आणि त्याचा संबंध थेट आपल्या महाराष्ट्राशी आहे. वनवासात असताना त्यांच्या प्रिय पत्नीचे, जानकीचे अपहरण रावणाने केले व तो तिला आपल्या राज्यात घेऊन गेला. या घटनेने श्रीरामांच्या जीवनाला एकदम कलाटणी मिळाली.
सीतेच्या हरणाची ती नाट्यमय अन् चित्तथरारक घटना गोदावरी नदीच्या काठी, पंचवटी या स्थळी घडून आली. महर्षी वाल्मीकींनी लिहिलेल्या ‘रामायणा’त या दोन्ही स्थलनामांचा तसा सुस्पष्ट उल्लेखच आला आहे. सांप्रतकाळी पंचवटी नाशिकनगरीचा एक भाग आहे. याचा अर्थ असा होतो की, उत्तर महाराष्ट्रातली ही भूमी त्या घटनेची केवळ साक्षीदारच आहे असे नाही, तर तिने रामायणातील सर्वात नाट्यमय प्रसंगाला नेपथ्यही पुरवले आहे.
महाभारत किंवा कृष्ण चरित्रात पूर्व ते पश्चिम असे भौगोलिक संदर्भ येतात, तर रामायणात किंवा रामजीवनात उत्तर ते दक्षिण असे प्रादेशिक उल्लेख आढळतात. अयोध्या ते लंका या वाटचालीत दण्डकारण्य हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यातच तेव्हा पंचवटी हे स्थळ होते. पंचवटीचा परिसर अतिशय रमणीय होता. आम्र, कदंब, पलाश, चंपक, पुन्नाग, चंदन इ. शेकडो प्रकारच्या वृक्षांची तिथे एकच दाटी झालेली होती. विविध वेली, जाळ्या, झुडपे, फुलझाडे यांनी ही भूमी आच्छादून टाकलेली होती. मृगांचे कळप, ससे, मोरांचे व इतर पक्ष्यांचे थवे यांनी परिसर जिवंत झाला होता. पुष्करिणीमधल्या प्रफुल्लित कमळांमुळे वातावरण सुगंधित व प्रसन्न झाले होते. झुळझुळ वाहणार्या गोदावरीच्या पात्रात हंस, चक्रवाक, कारंडव, सारंग मुक्त विहार करीत होते.
येथे रामांनी दाखवलेल्या सपाट आणि भक्कम जागी लक्ष्मणाने पर्णकुटी उभारायला घेतली. खोल खड्ड्यांत मजबूत खांब रोवून, त्याने वेताच्या भिंती उभ्या केल्या. त्या मातीने पूर्ण लिंपून, वर बांबूंनी उतरते छप्पर बांधले. त्यावर शमीच्या फांद्यांची छावणी करून दर्भ, पाने व गवत पसरून ते वेलींनी आवळून टाकले. शेवटी आतल्या दालनांत दगड, मुरूम, मातीची भर घालून समतल भूमीही तयार केली. ती विशाल आणि प्रशस्त पर्णकुटी पाहून राम आणि सीता अतिशय प्रसन्न झाले. वास्तुशांती करून ते तिघेही तेथे आनंदाने राहू लागले. जणू तो काही वनवास नव्हताच, आनंद पर्यटनासाठी ते आले होते.
कालक्रमणा सुरू असतानाच, एके दिवशी एक अनोळखी स्त्री रामाकडे आली आणि तिने आपली ओळख व हेतू समोर उभा राहून थेट प्रकट केला. ती शूर्पणखा होती. रावणाची बहीण व दण्डकारण्याची स्वामिनी. तिला रामाशी लग्न करायचे होते. एक पत्नीव्रत अनुसरणार्या रामांनी तिला लक्ष्मणाकडे पाठवले. त्याने तिचा उपहास केला, तेव्हा ती संतापून सीतेवर हल्ला करण्यासाठी झेपावली. मग, मात्र रामाने तिला कुरूप करण्याची आज्ञा दिली. त्यासरशी लक्ष्मणाने तिचे नाक छाटले व कानही कापले. तारस्वरात किंकाळ्या मारीत शूर्पणखा सैरावैरा धावत सुटली. खर व दूषण हे तिचे भाऊही दण्डकारण्यात होते. रक्तबंबाळ अवस्थेत तिने काय घडले ते खराला सांगताच त्याने 14 राक्षसांना रामावर पाठवले. त्यांनाही मारल्याचे वृत्त येताच खर व दूषण 14 हजार राक्षसांना घेऊन पंचवटीवर चालून गेले.
रामांनी सीतेला लक्ष्मणासह पर्वताच्या गुहेत पाठवले आणि मग दूषणासह सगळ्या झुंडीचा संहार त्यांनी केला. लगोलग त्रिशिरा व खर यांचाही नि:पात झाल्याने अगस्तींसह इतरही अनेक ऋषी-मुनी रामांच्या सत्कारासाठी पंचवटीत आले. अकंपन नावाचा एक राक्षस कसाबसा जीव वाचवून पळाला तो थेट लंकेत जाऊन रावपणापुढे उभा राहिला. दण्डकारण्यात आर्य राजकुमारांनी काय हाहाकार माजवला, हे त्याने सांगताच रावण हादरला. हे त्याच्या सामर्थ्याला व दहशतीलाच आव्हान होते. त्याच्या साम्राज्याची उत्तर बाजू पहिल्याच दणक्यात आर्यांनी खिळखिळी करून टाकली होती. काहीही करून त्यांचा पराभव करणे हे त्याला भागच होते. अकंपनानेच त्याला मग ‘सीता ही किती सुंदर आहे आणि रामाचे तिच्यावर किती नितांत प्रेम आहे, हे सांगितले. तिला पळवून आणले तर राम जिवंतच राहू शकणार नाही,’ हे सांगितले.
रावणाला हा कपटमार्ग पटला. तो आपल्या आकाशगामी रथातून ताटकापुत्र मारिचाकडे गेला. रावणाचा बेत ऐकताच मारिचाने त्याला परावृत्त केले. रावण लंकेला परतला तेव्हा नागिणीसारखी चवताळलेली शूर्पणखा त्याला भेटली. तिने त्याला आपबिती कथन केली आणि डिवचून, फटकावरून चेतवले, पेटवले. रावणाने समुद्र किनार्याने जात जात पुन्हा मारिचाची भेट घेतली. त्याने पुन्हा पुन्हा रावणाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. संभाव्य प्राणनाशाची कल्पनाही स्पष्ट शब्दांत दिली; पण आता रावण क्रोधाविष्ट होऊन हट्टालाच पेटला होता. शेवटी त्याने दक्षिणापथाचा सम्राट या नात्याने मारिचाला आज्ञाच दिली, की तू कांचनमृगाचे रूप धारण करून सीतेला मोहवश कर आणि रामाला पर्णकुटीपासून दूर ने! निरूपाय होऊन त्याला ती प्राणघातक आज्ञा ऐकणे भागच पडले. आता पुढचा कथाभाग तर सर्वांना ठाऊक आहे. सीतेचे हरण झाले तेव्हापासून पंचवटी आणि नाशिक यांना हिंदूंच्या मानससृष्टीत एक वेगळेच स्थान मिळाले. प्रभू रामचंद्रांचा पदस्पर्श व निवास तेथे झाल्याने ती पुण्यभूमी मानली जाऊ लागली.
The post राम कथेला कलाटणी देणारी पंचवटी appeared first on पुढारी.