विद्यार्थ्यांना आता पर्यटन युवा राजदूत होण्याची संधी

Indian Tourism Youth Ambassador,www.pudhari,news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकरच्या पर्यटन मंत्रालयाने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळा-महाविद्यालयांमध्ये युवा पर्यटन मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या मंडळाच्या माध्यमातून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना भारतीय पर्यटन युवा राजदूत होण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. या मंडळांच्या माध्यमातून पर्यटनकेंद्रित उपक्रमांच्या आयोजनावर भर देणार आहे.

इयत्ता सातवीपासून पुढील विद्यार्थ्यांचे युवा पर्यटन मंडळे असणार आहे. या विद्यार्थ्यांमध्ये आपल्या परिसरातील पर्यटन व वारसास्थळांबाबत कुतूहल निर्माण होऊन जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण करण्याचे काम हे मंडळ करणार आहेत. भारतीय पर्यटनाचे युवा राजदूत घडण्यासह विद्यार्थी आणि तरुणांमध्ये संघभावना, व्यवस्थापन नेतृत्व आणि सेवा अशी विविध कौशल्ये आत्मसात करणे, शाश्वत व जबाबदार पर्यटनाची जाणीव निर्माण होण्यासाठी या मंडळांची मदत घेतली जाणार आहे.

युवा पर्यटन मंडळ स्थापन करण्यासाठी प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे. सन 2023-2४ या वित्तीय वर्षामध्ये शाळांमध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी दहा, तर महाविद्यालयामध्ये स्थापन केलेल्या प्रत्येकी एका क्लबसाठी २५ हजार असा निधी ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर पर्यटन संचालनालयाकडे प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना वितरित करण्यात येईल. त्यासाठी २५ कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान, युवा पर्यटन मंडळामध्ये 25 विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रत्येक शाळेतील शिक्षक मंडळाचे समन्वयक म्हणून काम पाहतील. पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीसाठी सर्व सहभागी विद्यार्थी सदस्यांचे आधार क्रमांक, शिक्षक व विद्यार्थी समन्वयकांचे आधार क्रमांक, मुख्याध्यापक/प्राचार्यांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. युवा पर्यटन क्लब स्थापनेनंतर पर्यटनस्थळांना भेटी देण्याबाबत छायाचित्रांसह अहवाल मुख्याध्यापक अथवा प्राचार्यांच्या स्वाक्षरीने सादर करणे बंधनकारक राहणार आहे.

मंडळाचे असे असणार काम

युवा पर्यटन मंडळाच्या सदस्यांवर जवळपासच्या पर्यटनस्थळांना भेटी देणे, पर्यटनस्थळांसंबंधी चित्रकला, निबंध स्पर्धेचे आयोजन, पर्यटनस्थळे जोपासणे व संवर्धन करणे आदी जबाबदारी असणार आहे. तसेच पर्यटनस्थळांवर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान अशा विविध मोहिमांचे आयोजन करणे हे उपक्रम या युवा पर्यटन मंडळांकडून अपेक्षित आहेत.

हेही वाचा :

The post विद्यार्थ्यांना आता पर्यटन युवा राजदूत होण्याची संधी appeared first on पुढारी.