शरद पवारांच्या वक्तव्याचे स्वागत, आमचीही तीच भूमिका!

छगन भुजबळ, शरद पवार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्याचे स्वागत करतो, आमचीही तीच भूमिका असून, अजित पवार आमचे नेते आहेत. आम्हीही तेच म्हणतोय, म्हणून आम्ही शरद पवारांना भेटलो. आमच्यात कोणतीही फूट नाही, फक्त एक गट सरकारमध्ये सामील झाला आहे. तुम्हीही समर्थन द्यावे एवढेच आमचे पवारांना सांगणे असून, आम्ही पक्ष सोडलेला नाही. आमची निशाणी घड्याळच आहे. आमचा झेंडा तोच आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे.

खासदार सुप्रिया सुळेंपाठोपाठ ‘अजित पवार हे आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादीत कुठेही फूट पडलेली नाही’, असे वक्तव्य शरद पवार यांनी केल्यानंतर राजकीय वादळ उठले आहे. शरद पवार यांनी अजित पवार यांना माफ केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या या विधानावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनीही पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्याने संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

भुजबळांनी ब्राह्मण आणि संभाजी भिडेंच्या वक्तव्यावर ठाम राहत, काही मंडळी पराचा कावळा करतात. राजकारणात विकास हा महत्त्वाचा असतोच, पण भावना आणि तत्त्वदेखील महत्त्वाचे असतात. अनेक लोकं ही भावनेने जोडली जातात. त्यासाठी मताचा विरोध मताने करायला हवा, असे प्रत्युत्तर भुजबळांनी दिले आहे. २०१४ मध्ये मध्ये भाजपने समाजमाध्यमांचा मोठा उपयोग करून घेतला होता. समाजमाध्यमांचा असा उपयोग करून घेता येतो असा विचारदेखील कुणी केला नव्हता. मी जर ऑनलाइन भाषण केलं, तर लाखो लोकांशी बोलू शकतो. मागच्या आठवड्यात मी माझं म्हणणं मांडलं. त्याच्यावरून आता सुरुवात झाली, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :

The post शरद पवारांच्या वक्तव्याचे स्वागत, आमचीही तीच भूमिका! appeared first on पुढारी.