आमदार फारुक शाह : धुळे शहर मतदार संघातील कामांवरील स्थगिती मुख्यमंत्री यांनी उठवली

मुख्यमंत्री शिंदे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे शहर मतदार संघातील 73 कोटी रुपयांच्या कामांना असलेली स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवल्याची माहिती आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी दिली. त्यामुळे धुळ्याच्या एकवीरा देवी मंदिर परिसराच्या विकासासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील रस्त्यांचे रुपडे पालटण्यास मदत होणार आहे.

राज्यातील सरकारने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 914 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली होती. यात धुळे शहर मतदार संघातील 73 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश होता. या कामांना स्थगिती मिळाल्यामुळे विकास कामांना ब्रेक लागला होता. त्यामुळे धुळे शहर मतदारसंघाचे आमदार फारुक शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी शहर मतदारसंघातील महत्त्वाच्या कामांवर चर्चा करून ही स्थगिती उठवण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे यांनी 73 कोटी रुपयांच्या कामांवरील स्थगिती उठवल्याची माहिती आमदार शाह यांनी दिली आहे. या निधीमधून सुमारे 19 कोटी रुपये खर्चात धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारा अंतर्गत रस्ते, जलकुंभ तसेच इतर कामे होणार असून बारा कोटी रुपयांच्या निधीतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाची इमारत उभारणार आहे. तसेच सुमारे पाच कोटी रुपयांच्या रकमेतून वडजई रोड या कामाचा विकास होणार असून धुळ्यातील श्री एकवीरा देवी मंदिर परिसरात सुमारे तीन कोटी रुपये निधीतून भक्तनिवास, सभामंडप ,प्रवेशद्वार व इतर अनुषंगिक कामे केली जाणार आहे. या कामांवरील स्थगिती उठवल्याने आता आदिशक्ती एकवीरा देवी मंदिर परिसराचे रूपडे पालटणार आहे. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील रस्त्यांची झालेली दुरावस्था देखील दूर होणार आहे.

हेही वाचा:

The post आमदार फारुक शाह : धुळे शहर मतदार संघातील कामांवरील स्थगिती मुख्यमंत्री यांनी उठवली appeared first on पुढारी.