जळगावच्या ग.स. सोसायटी सभेत राष्ट्रगीत सुरू असताना शिक्षकांचा राडा

जळगाव

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी  ग. स. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज  (दि. ४) नूतन मराठा महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये झाली. यावेळी पटलावरील विषय वाचन सुरु असताना उदय पाटील यांच्या हातून विषय पत्रिका एका सभासदाने हिसकावून घेतली. त्यानंतर काही सभासद स्टेजवर आल्यानंतर सत्ताधारी व सभासदांमध्ये  राडा झाला.

संचालक मंडळ व्यासपीठावर विषय मांडत असताना उपस्थित केलेला विषय मंजूर नसल्याचे सांगत उपस्थितांपैकी सभा सदस्यांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केल्याने प्रचंड गोधळ उडाला. या सभेत संचालक मंडळाने घेतलेला निर्णय मान्य नसल्याने तसेच बोलू दिले जात नसल्याने विरुद्ध गटातील सदस्य व सत्ताधारी आमने-सामने आले. व्यासपीठावर संचालक मंडळ व उपस्थित शिक्षकांमध्ये अरेरावी आणि धक्काबुक्की झाली. सहकार गटाच्या संचालक मंडळाकडून सर्व विषय या सभेत मंजूर करण्यात आले. त्यानंतर थेट राष्ट्रगीताला सुरवात झाली वाद थांबला. मात्र राष्ट्रगीत सुद्धा गोंधळातच पार पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

सभेत परस्पर विषयांना मंजुरी- मनोज पाटील

सहकार गटाकडून करण्यात येत असलेला आरोप अत्यंत चुकीचा आहे. लोकशाही पद्धतीत बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे; पण म्हणणे मांडू न देता या सभेमध्ये विषय मंजूर करण्यात आले. त्यामुळे गोंधळ उडाला. दुसरीकडे कायदेशीर बाबीचंही या ठिकाणी पालन करण्यात आलेलं नाही, असं म्हणत लोकसकार गटाचे मनोज पाटील यांनी सांगितले.

विरोधी गटानेच घातला गोंधळ- उदय पाटील

लोक सहकार गटाच्या मनात राग आहे. मात्र प्रत्यक्षात विरोध दर्शविण्यासाठी कुठलाही मुद्दा नसल्याने त्यांनी अशा पद्धतीने शिक्षक सभासदांच्या माध्यमातून गोंधळ निर्माण केल्याचा आरोप सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील यांनी केला आहे.

हेही वाचलंत का?

The post जळगावच्या ग.स. सोसायटी सभेत राष्ट्रगीत सुरू असताना शिक्षकांचा राडा appeared first on पुढारी.