जळगाव : जनगणनेत आपला धर्म ‘हिंदू’ लिहा : श्याम महाराज

श्याम महाराज,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

अ. भा. हिंदू गोरबंजारा लबाना नायकडा समाज कुंभ 25 जानेवारीपासून सुरू आहे. कुंभाच्या पाचव्या दिवशी हिंदू भूषण श्याम महाराज यांनी येत्या जनगणनेत बंजारा, लबाना आणि नायकडा समाज, जनजाती, लिंगायत व सर्व सनातन धर्मीयांनी आपला धर्म हिंदू धर्म म्हणून लिहावा, असे आवाहन केले. काही देशविघातक शक्तीकडून हिंदू समाजात फूट पाडून देशाचे तुकडे करण्याचे षडयंत्र चालू केले आहे. त्याला आपण बळी न पडता, आपली ओळख हिंदू हीच असली पाहिजे, असे सांगितले.

कुंभाच्या पाचव्या दिवशी धर्मसभेच्या मंचावर अमर लिंगनाजी, रायसिंगजी महाराज, यशवंतजी महाराज, नरोत्तम प्रकाश स्वामी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ. भा. कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी, रामानंदचार्य राजराजेश्वराचार्य गोपालचैतन्य महाराज, अर्जुन महाराज, सिंद्रराव महाराज, कबिरदास महाराज, बद्ददु नायक, बाबूसिंग महाराज, जितेंद्रनाथ महाराज, कैलास महाराज उपस्थित होते.

अमर लिंगनाजी यांनी आपल्या मार्गदर्शनात धर्मांतर झालेल्यांची पुन्हा घरवापसी झाली पाहिजे, असे आवाहन केले. रायसिंग महाराज यांनी आपणही हिंदू आहोत. वैदिक समाज, संस्कृती आणि धर्म जपा असे आवाहन केले. यशवंत महाराज यांनी कुंभाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेतला. देशातील बंजारा समाज एकत्र आला याचा काही जणांना त्रास होतो आहे, आपण एकत्र आले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. नरोत्तम स्वामीजी यांनी बंजारा समाज भगवान राम व कृष्णाचा सेवक असल्याचे सांगितले.

संघटित समाजाची गरज : जोशी…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भय्याजी जोशी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये धर्माच्या मार्गावर चालणारा समाज हिंदू समाज, आपला समाज निद्रावस्थेत जातो. कर्तव्य विसरतो तेव्हा संत आपल्याला जागृत करतात. ही जागरण प्रक्रिया निरंतर चालत राहिली पाहिजे. आज जगात कोण कुणासमोर झुकतो सर्व जाणतात. शक्तींसमोर सर्व झुकतात. विना संघटन शक्ती नाही. आपल्याला जागृत पण व्हायचे आहे आणि संघटितही व्हायचे आहे. पोशाख, पूजा पद्धती भिन्नता असेल पण अंत:करणात आपण एकच हिंदू असल्याचे सांगितले. गोपाल चैतन्य महाराज यांनी सद्गुरूला शरण जा, तुम्हाला ते सनातन धर्माची महिमा सांगत मार्गदर्शन करतील, असे आवाहन केले.

हेही वाचा :

The post जळगाव : जनगणनेत आपला धर्म 'हिंदू' लिहा : श्याम महाराज appeared first on पुढारी.