जळगाव : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून तरूणाला घातला ३१ लाखांचा गंडा

जळगाव : जळगाव शहरातील सदोबा नगरात राहणाऱ्या एका तरुणाची पैसे डबल करून देण्याच्या नावाखाली तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात औरंगाबाद येथील सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महेश तुकाराम भोळे (वय-३५, रा. आसोदा ता. जि. जळगाव हल्ली मुक्काम सदोबा नगर जळगाव) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान फेब्रुवारी २०२२ मध्ये त्याची ओळख औरंगाबाद येथील अरुण नागोराव अंभोरे यांच्याशी झाली. अंभोरे यांनी औरंगाबाद एमआयडीसीतील शेंद्रा येथे इंडोपर्ल नावाच्या शिंपल्यापासून मोती तयार करण्याची  कंपनी स्थापन केली. त्यामध्ये त्यांची पत्नी मुलगी तसेच इतर तीन जण संचालक म्हणून काम पाहत आहे.

कोरे चेक देऊन फसवणूक…
दरम्यान, महेश भोळे यांच्याशी वेळोवेळीसंपर्क करून १३ महिन्यात पैसे डबल होतील, असे सांगून महेश भोळे यांच्याकडून वेळोवेळी एकूण ३१ लाख ५० हजार रुपये घेतले. त्याच्या बदल्यात अंभोरे यांनी दोन कोरे चेक देऊन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर महेश भोळे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा…

भोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुरुवारी १५ डिसेंबर रोजी मध्यरात्री संशयित आरोपी अरुण नागोराव अंभोरे त्यांची पत्नी मंदा अरुण अंभोरे, मुलगी दिलीप अरुण अंभोरे, राहुल शेळके, विनोद बाहेकर आणि आकाश आठल्ये सर्व रा. शेंद्रा एमआयडीसी औरंगाबाद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून तरूणाला घातला ३१ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.