दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद; जळगाव दूध संघासाठी १०० टक्के मतदान; उद्या होणार फैसला

Jalgaon Dudh Sangh Election

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी शनिवारी (दि. १०) मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर दिवसभरात १०० टक्के मतदान झाले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे विरुद्ध भाजपचे गिरीश महाजन यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दोघांपैकी कोण बाजी मारेल याचा फैसला रविवारी (दि. ११) होणार आहे. (Jalgaon Dudh Sangh Election)

जिल्हा दूध संघात (Jalgaon Dudh Sangh Election) एकूण २० जागांसाठी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. जळगाव, भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा ७ तालुक्यातील केंद्रांवर मतदान झाले. या निवडणुकीला १०० टक्के म्हणजे सर्व ४४१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आता मतमोजणीचा कार्यक्रम रविवारी (दि. ११) सकाळी ८ वाजल्यापासून श्री. सत्यवल्लभ हॉल, संगम सोसायटी, जळगाव येथे होईल. त्यामुळे मतदानाचा निकाल काय लागतो याकडे संपुर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. भुसावळ मतदान केंद्रावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी मतदानाचा हक्क बजावला. भुसावळमध्ये एक मतदान केंद्र लावण्यात आले आहे. या केंद्रावर ४४ जणांनी मतदान केले.

दोन मंत्री, सात आमदार खडसेंच्या विरोधात…

दूध संघ ताब्यात घेण्यासाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सात आमदार हे एकनाथ खडसे यांच्या विरोधात उभे ठाकले असल्याने एकनाथ खडसे हे एकटे पडल्याचे चित्र दिसत आहे. एकूणच आजपर्यंत कोणत्याही दूध संघाची निवडणूक राजकीय आखाडा बनली नसेल अशी जळगाव दूध संघाची निवडणूक आखाडा बनली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.

पालकमंत्र्यांच्या विरोधात महापौरांच्या सासू…

जळगाव दूध संघ निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जळगावच्या महापौर जयश्री महाजन यांच्या सासू मालती महाजन या जळगाव तालुक्यातून उमेदवार आहेत. जळगाव शहरातील मतदान केंद्रावर महापौर जयश्री महाजन यांनी आणि त्यांच्या सासू मालती महाजन यांनी मतदान करून मतदानाचा पहिला हक्क बजावला असल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा

The post दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद; जळगाव दूध संघासाठी १०० टक्के मतदान; उद्या होणार फैसला appeared first on पुढारी.