Site icon

दिल्लीतील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडला रास्तारोको

चांदवड (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा – पंजाब व हरियाना राज्यातील शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्च्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच मागण्यांची पूर्तता करण्यासाठी चांदवड तालुका कॉंग्रेस पार्टी, किसान सभा, लाल बावटा यांच्या वतीने शुक्रवार (दि. १६) रोजी सकाळी ११ वाजता येथील गणूर चौफुलीवरील चांदवड – मनमाड रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. अचानक रास्ता रोको झाल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली होती. यावेळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांनी मागण्यांचे निवेदन देत रास्तारोको मागे घेतला.

हरियाणा व पंजाब येथील शेतक-यांचा संयुक्त किसान मोर्च्या विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे आगेकूच करत आहे. या मोर्च्यावर केंद्र सरकारने अमानुषपणे अश्रुधुरांचा मारा केला. यामुळे चेंगराचेंगरी होऊन काही शेतकरी जखमी झाले आहेत. या शेतकऱ्यांच्या मोर्च्यास पाठिंबा दर्शवण्यासाठी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली येथील गणूर चौफुलीवरील चांदवड – मनमाड विंचूर प्रकाशा मार्गावर रास्तारोको करीत आंदोलन करण्यात आले.

घोषणांनी दणाणला परिसर, पोलिसांची दमछाक

यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. कांद्यावरील निर्यात बंदी खुली करा, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा एक ना अनेक घोषणा दिल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. अचानक रास्तारोको झाल्याने वाहतूक कोंडी झाली. यामुळे प्रवाश्यांचे हाल झाले. अचानक रास्तारोको झाल्याने पोलीसांची देखील दमछाक उडाली, यावेळी पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करीत रस्त्यावरून उठण्याची विनंती केली. यावेळी पोलीस निरीक्षक वाघ यांना सभापती संजय जाधव, संपतराव वक्ते, समाधान जामदार, अॅड. दत्तात्रय गांगुर्डे, भीमराव जेजुरे, आदींनी निवेदन दिले. आंदोलनात खेमराज कोर, दिलीप पाटील, हनुमंत गुंजाळ, कैलास बोरसे, भगवान बोराडे, दिलीप वाघ, तुकाराम गांगुर्डे आदीसह आंदोलनकर्ते सहभागी झाले होते.

या आहेत मागण्या 

किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायदा लागू करा, स्वामिनाथन आयोग लागू करा, कृषी कर्ज माफ करा, कांदा निर्यातबंदी खुली करा, पिक विमा भरपाई तत्काळ द्या.

हेही वाचा :

The post दिल्लीतील शेतकऱ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडला रास्तारोको appeared first on पुढारी.

Exit mobile version