धुळे : डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था दूर न केल्यास ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा

धुळे

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे शहराला डेडरगाव तलावातून करण्यात येतो. सध्या या येथील जलशुध्दीकरण केंद्रावरील बंद पडलेल्या फिल्टरमधून पाणी देऊन मनपा प्रशासनाकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. या जलशुद्धीकरण केंद्राची तातडीने दुरुस्ती न केल्यास शिवसेना तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल, असा इशारा आज (दि.३१) शिवसेनेचे (ठाकरे गट) धुळे विधानसभा संघटक ललित माळी यांनी दिला आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्रावर भेट दिली. यावेळी या जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था झाल्याची माहिती ललित माळी यांनी दिली. या संदर्भात त्यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या भेटी दरम्यान जलशुद्धीकरण केंद्राचे अत्यंत विदारक दृश्य पाहायला मिळाले.

जलशुद्धीकरण केंद्रावर फिल्टर, पंप, टाक्या, टनेल इत्यादींपैकी कोणतीही गोष्ट सुव्यवस्थित आढळली नाही. जलशुद्धीकरण करुन शुद्ध पाणी साठविलेले टाकी वरील स्लॅप सुमारे ३ ते ४ वर्षापासुन पडला आहे. सदर टाकीमध्ये साठविलेल्या लाखो लिटर पाण्यावर स्लॅप रुपी झाकण नसल्याकारणाने पाणी पुन्हा अशुद्ध होत असल्याचे धक्कादायक परिस्थिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिली.

सदर जलशुद्धीकरण केंद्रावर असलेल्या दोन प्रमुख गाळण करणारे मोठ्या फिल्टर यापैकी एक फिल्टर हे व्हॉल्व निकामी झाल्याने सुमारे वर्षभराच्या कालावधीपासून पूर्णतः बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर दुस-या फिल्टरमध्ये योग्य ती निगा अथवा काळजी न घेतल्याने दुसरे फिल्टरही केवळ दिखावु स्वरूपात सुरू आहे. परिस्थिती निदर्शनास आली.

एअर फिल्टर करणारे मोटर मागील सुमारे दोन-तीन वर्षांपासून बंद असल्याची माहिती मिळाली. तसेच इनलेट वॉल, आउटलेट वॉल, वॉश वॉटर वॉल, एअर वॉल तसेच बेड व्हॉल्व यापैकी सर्व वस्तूंना गंज लागलेला होता. यापैकी अनेक व्हॉल्वे बंद अवस्थेत आढळले. तर उर्वरित व्हॉल्व हे योग्य ती काळजी न केल्याने काही दिवसातच बंद पडतील अशा अवस्थेत आढळले. सदर जलशुद्धीकरण केंद्रात येणारे पाणी तसेच जलशुद्धीकरण झाल्यानंतरचे पाणी याच्या प्राथमिक चाचण्या घेतल्या असता मुळात जलशुद्धीकरण पूर्णतः होत नसल्याची गंभीर बाब समोर आली. जलशुद्धीकरण होऊन आलेल्या पाण्याचा पीएच हा मनुष्यासाठी पिण्यायोग्य नाही, ही बाब प्रथमदर्शनी केलेल्या चाचणीत निष्पन्न झाली असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.

जलशुद्धीकरण केंद्रावर एकही तज्ञ, जबाबदार अधिकारी उपस्थित नाही

शिवसेनेना पदाधिकाऱ्यांच्या भेटीवेळी जलशुद्धीकरण केंद्रावर पाणी शुध्दीकरण प्रक्रियेतील यंत्र सामुग्री चालु होती. परंतु त्याठिकाणी एकही तज्ञ इंजिनियर अथवा जलशुद्धीकरण प्रक्रियेतील माहिती असलेला तज्ञ व्यक्ती उपस्थित नव्हता. सदर जलशुद्धीकरण केंद्रावर केवळ एक गार्ड व एक शिपाई उपस्थित होता. असा आरोप देखील करण्यात आला आहे.

हेही वाचा; 

The post धुळे : डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची दुरावस्था दूर न केल्यास ठाकरे गटाचा आंदोलनाचा इशारा appeared first on पुढारी.