धुळे तालुक्यातील रतनपुरा शिवारात शेतमजुराचा खून

Murder

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील रतनपुरा शिवारात एका शेत मजुराचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या मजुरासमवेत काम करणाऱ्या त्याच्या मित्रानेच त्याचा काटा काढल्याचा पोलिसांना अंदाज आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांचे पथक या मारेकऱ्याच्या तपास करत असून अज्ञाताविरोधात तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रतनपुरा शिवारातील रखुमाई दौलत वाघ यांच्या शेतात आदर्श दत्तात्रय पिसाळ (वय २३ ) या मजुराचा मृतदेह आढळून आला आहे. घटनेच्या एक दिवस आधीच आदर्श पिसाळ हा सातारा जिल्ह्यातील फलटण येथे राहणाऱ्या रोहिदास दादाराव जाधव यांच्या समवेत वाघ यांच्या शेतात आला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी पिसाळ याचा मृतदेह आढळून आला. पिसाळ याच्या डोक्यावर टणक हत्याराने वार केले असल्याचा पोलिसांना संशय असून हा खुनाचा प्रकार असावा असा प्राथमिक तपासात अंदाज काढण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मजुरीच्या कामाच्या पैशासाठी मद्याच्या नशेत वाद घातल्यानंतर ट्रॅक्टरच्या स्टेपलिंग राॅडने मयताच्या डोक्यावर वार केला असल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान मयताचा भ्रमणध्वनी देखील संबंधित हत्या करणाऱ्या आरोपीने नेला असून या मोबाईलच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या संदर्भात शिवपाल पिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रोहिदास जाधव यांच्या विरोधात भादवी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post धुळे तालुक्यातील रतनपुरा शिवारात शेतमजुराचा खून appeared first on पुढारी.