धुळे : शेतकरी, सर्वसामान्य जनता सुखी संपन्न व्हावी हेच ध्येय – आ. कुणाल पाटील

धुळे www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राजकारण आणि समाजकारण करताना धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनता, युवक यांना केंद्रस्थानी ठेवून नेहमीच प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुखात सामील होवून तालुक्यातील जनता सुखी संपन्न व्हावी हेच माझे ध्येय राहिले आहे. असे प्रतिपादन आ. कुणाल पाटील यांनी आर्णी येथे झालेल्या कार्यक्रमात केले.

धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून धुळे तालुक्यातील वरखेडी ते आर्णी तसेच आर्णी ते शिरधाणे फाटा या रस्त्याच्या विकासकामाचा नुकताच प्रारंभ झाला. या कामासाठी आ. पाटील यांच्या प्रयत्नातून एकूण 5 कोटी 70 लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. याप्रसंगी आर्णी जि.प. शाळेच्या सरंक्षक भिंतीच्या कामाचेही उद्घाटन करण्यात आले. याकरीता एकूण 10 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता. ते म्हणाले, धुळे तालुक्यात रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत रस्त्यांचे जाळे विणले. तर यापुढेही उर्वरीत रस्त्यांच्या कामांना गती दिली जाणार आहे. येथील गोरगरीब जनता, विधवा माता भगिनी, ज्येष्ठ नागरीक यांच्यापर्यंत वैयक्तिक लाभाच्या योजना पोहचविण्याचेही काम केले आहे. तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करुन दिला.  शेतकर्‍यांची मुले शिक्षण घेवून आईवडीलांसह गावाचे आणि तालुक्याचे नाव मोठे व्हावे म्हणून शेतकर्‍यांच्या जीवनात समृध्दी यावी व त्यांची प्रगती व्हावी यासाठी सिंचनाच्या कामे केली. या सिंचनाच्या कामांमुळे बागायतीच्या क्षेत्रात वाढ झालेली आहे. शेती सुजलाम सुफलाम होवून शेतकरी सुखी संपन्न व्हावा यासाठी झटत असतो. तसेच रुग्णांना वैद्यकीय सुविधा व मदत करीत प्रत्येकाच्या सुख दुखात सहभागी होत जनतेला आधार देण्याचे काम केले आहे. यापुढेही कायमस्वरुपी धुळे तालुक्यातील जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वरखेडी ते आर्णी आणि आर्णी ते शिरधाणे फाटा रस्ता पूर्ण झाल्यानंतर धुळे शहरातून थेट अमळनेर तसेच जळगाव जिल्हयात जाण्यासाठी अंतर व वेळेची बचत होणार आहे. धुळे, वरखेडी, आर्णी यासह परिसरातील नागरीकांची गैरसोय दूर होणार आहे. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला माजी जि.प.सदस्य साहेबराव खैरनार, माजी पं.स.सदस्य योगेश पाटील, माजी पं.स.सदस्य ज्ञानेश्‍वर मराठे, दिनकर पाटील, बापू खैरनार,पं.स.सदस्य सुरेखाताई बडगुजर,शिवाजी अहिरे,गोपीचंद सुर्यवंशी,पांडूरंग मोरे, मनिषा खैरनार,सरंपच निलेश पाटील आदी उपस्थित होते. ज्ञानेश्‍वर मराठे यांनी सुत्रसंचालन केले.

हेही वाचा:

The post धुळे : शेतकरी, सर्वसामान्य जनता सुखी संपन्न व्हावी हेच ध्येय - आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.