नंदुरबार : अतिदूर्गम भागातील रिंकी पावराची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : धडगाव तालुक्यातील एका दुर्गम भागातील रिंकी पावरा हिची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत ५००० मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या निवडीनंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रिंकी पावरा ही मूळची धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थिनी आहे. ती सध्या जी. टी. पाटील महाविद्यालयात शिकत आहे. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. टी. एल. दास यांचे तिला मार्गदर्शन लाभले. रिंकी पावरा हिची आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत निवड होण्यापूर्वी अश्वमेध विद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक, अंतर विद्यापीठ मैदानी स्पर्धेत रौप्य पदक, अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत रजत पदक तसेच खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत रौप्य पदक मिळवून दैदीप्यमान कामगिरी केलेली आहे. आता तिची निवड चेंगडू, चीन येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी झाली आहे.

रिंकी आज दिल्ली विमानतळावरुन चीनला रवाना झाली. महाविद्यालयाच्या विनंतीनुसार रिंकी पावराचा आंतरराष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी लागणारा सर्व खर्च विशेष बाब म्हणून क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाने केला. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. व्ही. एल. माहेश्वरी आणि विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील तसेच स्थानिक पातळीवर सर्व खर्च महाविद्यालयाने उपलब्ध करून प्रोत्साहन दिले, त्याबद्दल रिंकीने त्यांचे आभार मानले आहेत.

रिंकी पावराने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल नं. ता. वि. समिती संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नं. ता. वि. समिती संस्थेचे व्हाईस चेअरमन मनोज रघुवंशी, क. ब. चौ. उ. म. विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. एम. जे. रघुवंशी, संस्थेचे समन्वयक डॉ. एम. एस. रघुवंशी, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले. तसेच रिंकीच्या पुढील कामगिरीकरिता उत्कृष्ठ शुभेच्छा दिल्या.

The post नंदुरबार : अतिदूर्गम भागातील रिंकी पावराची आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड appeared first on पुढारी.