नाशिक : आठ-दहा गावांचा पाणीप्रश्न सुटणार; आ.गावीत यांच्या हस्ते बेहेरगाव लघुप्रकल्पाचे भूमिपूजन

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बेहेरगाव येथे लघुप्रकल्पाचे आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या लघु प्रकल्पामुळे आठ-दहा गावांचा कृषी सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार एक हजार एकरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येणार असून, बेहेरगाव लघु प्रकल्पावर ३२ कोटी रुपये खर्च होणार,अशी माहिती आ.मंजुळा गावित यांनी दिली.

बेहेरगाव येथील घोड नदीवरील गोंधळी नाल्यावर साठवण बंधाऱ्याचे सर्वेक्षण २००९-१० या वर्षात पाटबंधारे विभागामार्फत झाले होते. मात्र या प्रकल्पाबाबत पाठपुरावा न झाल्यामुळे आजतागायत या साठवण बंधाऱ्याचे काम मार्गी लागले नाही. मध्यंतरीच्या कालावधीत आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते पोपटराव सोनवणे यांनी प्रयत्न केले. आ.मंजुळा गावित निवडून आल्यानंतर बेहेरगाव, बसरावळ, खैरखुंटा, काब-या खडक या प्रकल्पांची कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न सुरू केले. त्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्री, पाटबंधारे विभागाचे प्रधान सचिव, जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याबरोबर सातत्याने पत्रव्यवहार, मंत्र्यांबरोबर बैठका आयोजित केल्या. त्यानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याने बेहेरगाव या लघु प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध होऊन त्याचे कार्यारंभ आदेशदेखील झाले. या धरणाचे आ.मंजुळा गावित यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

डॉ.तुळशीराम गावित प्रकृतीच्या कारणामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे लवकरच ते पुन्हा सक्रिय होतील,असे आ.गावित यांनी सांगितले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, मंगलाताई सुरेश पाटील, पं.स.सदस्य रवींद्र खैरनार, सिंधूबाई बागले, जलसंधारण अधिकारी रवींद्र खोडे, उपअभियंता अविनाश सोनवणे, ज्येष्ठ नेते उत्तम बापू देसले, सरपंच कविता, मा.पं.स.सदस्य अशोक मुजगे, नगरसेवक सुमीत नागरे, पोलिस निरीक्षक गायकवाड, ठेकेदार अविनाश मोरे, बाळासाहेब पाटील, सरपंच मनोज देसले, दादा नांद्रे, ताहीरवेग मिर्झा, युनूस पठाण, बेहेरगावचे सरपंच अर्जुन बोरकर, उपसरपंच कैलास बाचकर व ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, परिसरातील शेतकरी बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.

धरणामुळे या गावांना होणार फायदा

वेहेरगाव, वाघापूर,म्हसाळे,होहदाणे, आमोदे,गोकुळनगर, शिवाजीनगर व परिसरातील आठ-दहा गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. देहेरगाव परिसर ठेलारी, मेंढपाळ,धनगर अशा भटक्या विमुक्त जाती-जमातीची.वस्ती असलेला परिसर आहे. उन्हाळ्यात मेंढपाळांना मेंढयासाठी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असतो.या प्रकल्पामुळे सुमारे एक हजार एकरांपेक्षा जास्त शेतजमीन ओलिताखाली येणार आहे.या धरणाच्या उभारणीसाठी ३४ कोटी रुपयांच्या आसपास खर्च येणार आहे.या प्रकल्पाबरोबरच बसरावळ आणि खैरखुंटा या लघु प्रकल्पांच्या निविदा मार्गी लागलेल्या आहेत. काब-याखड़क प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करून घेतली असून,निविदा प्रसिद्ध होण्याचे काम अंतिम टप्यात असल्याची माहिती आ.मंजुळा गावित यांनी बेहेरगाव लघु प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभावेळी दिली.

The post नाशिक : आठ-दहा गावांचा पाणीप्रश्न सुटणार; आ.गावीत यांच्या हस्ते बेहेरगाव लघुप्रकल्पाचे भूमिपूजन appeared first on पुढारी.