नाशिक : आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाला ‘उभारी’

जिल्हा माहिती अधिकारी www.pudhari.news

नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 2 ऑक्टोबर 2020 पासून उभारी उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमाअंतर्गत संबंधित कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देताना त्यांना आत्मनिर्भर केले जात आहे. विभागामध्ये ऑगस्ट 2022 अखेरपर्यंत 1 हजार 656 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबापैकी 1 हजार 563 कुटुंबाना उभारी अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे.

शासनाच्या प्रचलित नियमाप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसांना एक लाख रुपये इतकी आर्थिक मदत देण्यात येते. परंतु, नियमाप्रमाणे आर्थिक मदत दिल्यानंतर प्रशासकीय जबाबदारी संपत असली तरी सामाजिक जबाबदारी पूर्ण होत नाही. हीच सामाजिक जबाबदारी व उत्तरदायित्वाच्या भावनेतून नाशिक विभागात 2 आक्टोबर 2020 पासून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी उभारी कार्यक्रम राबविला जात आहे. त्याअंतर्गत विभागात 1 जानेवारी 2015 पासूनचे ज्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या लाभार्थी कुटुंबांचे विविध मुद्यांवर आधारित सर्वेक्षण करण्यात येऊन त्यांना लागू असलेल्या शासकीय योजनांचा लाभ देण्यात येतो. जिल्हातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना नियुक्त केलेल्या संबंधित शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यामार्फत भेट देऊन प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करण्यात येते. त्यामध्ये कुटुंबाने मागणी केलेल्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे काय? सद्य:स्थितीमध्ये कुटुंबप्रमुख कोण आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या नावे असलेली जमीन, प्लॉट, घर व इतर स्थावर मालमत्ता वारसांच्या नावे झाली आहे का? सामाजिक प्रवर्ग, संबंधित कुटुंबातील व्यक्तींना आर्थिक बळ देण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे शक्य आहे का? मदतीसाठी स्वयंसेवी संस्थाची मदत घेणे, उभारीअंतर्गत कुटुंबास भेट देत त्यांच्या अडचणी समजुन घेणे, त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला आहे किंवा नाही हे जाणून घेताना मिळाल नसल्यास तो मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी जिल्हास्तरीय आणि उपविभागीय स्तरावर समित्या कार्यरत आहेत.

– रणजितसिंह राजपूत, जिल्हा माहिती अधिकारी, नाशिक.

या योजनांचा समावेश…
उभारी उपक्रमाअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या विविध योजनांद्वारे मदत करण्यात येते. त्यामध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य, पीकविमा, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालय, जनधनमध्ये बँकखाते उघडणे, महात्मा जोतिबा फुले कर्जमाफी, प्रकल्प संचालक आत्मा यांच्याकडील शेतकरी गटाच्या लाभाची योजना, जिल्हा पशुसंवर्धन अधिकार्‍यांकडील 75 टक्के अनुदानावर शेळी गटात समावेश करणे, घरकुल, संजय गांधी निराधार अनुदान, बळीराजा चेतना, विहीर सिंचन, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य, खरीप अनुदान, वीज/गॅसजोडणी, रोजगार हमी, वारस नोंदणी, प्रधानमंत्री किसान योजना, महिला बचतगटात समाविष्ट करणे, स्वयंरोजगारासाठी मदत करणे, मुलांना शिष्यवृत्ती योजना, शेती अवजारे योजनांचा यात समावेश आहे.

‘आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये जगण्याची नवी उमेद निर्माण करण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने उभारी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. उपक्रमाअंतर्गत अनेक कुटुंबांना शासकीय मदत देण्याबरोबर इतर सामाजिक संस्था व व्यक्ती यांच्याकडूनही मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. उभारीला विभागात चांगले यश मिळाले असून, ही समाधानाची बाब आहे.” – राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक.

हेही वाचा:

The post नाशिक : आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाला ‘उभारी’ appeared first on पुढारी.