नाशिक : एमबीए सीईटी परीक्षेत तांत्रिक घोळ

एमएचटी सीईटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरामध्ये शनिवारी (दि. २५) एमबीए या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेत सर्व्हर डाउन आणि तांत्रिक घोळ निर्माण झाला होता. या सर्व प्रकारांत अर्धा तास वाया गेल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

पंचवटीमधील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अण्णासाहेब पाटील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये एमबीए सीईटी परीक्षेदरम्यान गोंधळ निर्माण झाला होता. या परीक्षा केंद्रात ४३१ विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी उपस्थित हाेते. या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार हॉल तिकीटावर अडीच तासांची वेळ दिलेली होती. प्रत्यक्षात मात्र स्क्रीनवर 180 मिनिटे दाखविण्यात आले. तसेच परीक्षेवेळी सर्व्हर डाउन होतानाच अनेक अडचणीही निर्माण झाल्या होत्या. या सर्व प्रकारांत सुमारे अर्धा तास वाया गेल्याची तक्रार करीत विद्यार्थी आणि पालक यांनी संताप व्यक्त केला. तसेच आमचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने परीक्षा पुन्हा घ्यावी किंवा गुण वाढवून द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. दरम्यान, पंचवटी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी केंद्रात दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.

स्क्रीनवर १८० मिनिटे

एमबीए सीईटी परीक्षेसाठी राज्यभरात पेपर होता. नाशिक शहरातही अनेक केंद्रांमध्ये या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. साधारणत: महा-एमबीए / एमएमएस सीईटी परीक्षा ऑनलाइन सीबीटी मोडमध्ये घेतली जाते. एकूण परीक्षेचा कालावधी 150 मिनिटांचा असतो. त्यात एमएएच सीईटी परीक्षेच्या पॅटर्ननुसार, 4 विभागांमधून 200 प्रश्न विचारले जातात. मात्र यावेळी अडीच तासांचा पेपर असताना स्क्रीनवर 180 मिनिटे दिसून आली. तसेच पेपरमध्ये तांत्रिक गोंधळ झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : एमबीए सीईटी परीक्षेत तांत्रिक घोळ appeared first on पुढारी.