नाशिक : ऑल मालेगाव मुस्लीम कम्युनिटी कमिटीची स्थापना

मुस्लिम www.pudhari.news

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
ऑल मालेगाव मुस्लीम कम्युनिटी कोऑर्डिनेशन कमिटीची स्थापना करत भविष्यात एकजूट राहून मुस्लीम समाजाच्या उत्कर्षासाठी संघटित राहाण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्फराज आरजू होते. यावेळी सन्मानचिन्ह देऊन बिरादरीप्रमुखांचा गौरव करण्यात आला. राजकीय मतभेद बाजूला ठेवून समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी विविध 18 मुस्लीम बिरादरी एकत्र आल्या आहेत.

मालेगाव हायस्कूलच्या प्रांगणात शुक्रवारी (दि. 27) रात्री हा कार्यक्रम झाला. मुस्लीम समाज विविध बिरादरींमध्ये विखुरला गेला आहे. या बिरादरींच्या चालीरिती काही प्रमाणात भिन्न आहेत. मात्र सर्व कुराण व हदिसला मानणारे आहेत. त्यामुळे आपले राजकीय मतभेद, चालीरिती सांभाळून किमान समाजाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रित यावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद मिळून ऑल मालेगाव मुस्लीम कम्युनिटी कोऑर्डिनेशन कमिटीची स्थापना झाल्याचे हाजी युसूफ इलियास यांनी सांगितले. आपले सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विचार प्रगल्भ व्हावेत म्हणून एकसंघ राहणे गरजेचे आहे. समाजातील वाईट गोष्टींपासून नागरिकांना प्ररावृत्त करणे, शैक्षणिक शिबिरांचे आयोजन करणे, नशामुक्तीसाठी जनजागृती यासारखे उपक्रम राबविले जातील, असे इलियास यांनी सांगितले. याप्रसंगी अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मुख्तार कुरैशी, हाफिज अब्दुल, हाफिज इनायततुल्ला, इसाक जरवाले आदी उपस्थित होते.

कमिटीत समाविष्ट बिरादरी
ऑल इंडिया मोमीन कॉन्फरन्स मालेगाव, अत्तार पटवे बिरादरी, दाऊदी बोहरा रोशन खयाल, मन्सुरी, ऑल इंडिया जमियत अल कुरैश, समस्त मेमन जमात मालेगाव, अंजूमन मुस्लीम शाह बिरादरी, पिंजारी निदाफ वेलफेअर असोसिएशन, जमियत बागबान, मालेगाव मुस्लीम खाटीक समाज, पगडी मोमीन जमात, अंजूमन इत्तेहाद तांबोली जमात, रहेबरे दख्खन व अन्सारी बिरादरी मालेगाव, अल कुरैशी इसलाई कमिटी, तडवी जमात, सिया असना आसरी जमात, मुस्लीम टकारी बिरादरी, जुलाहा बिरादरी या संघटना एकत्र आल्या आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : ऑल मालेगाव मुस्लीम कम्युनिटी कमिटीची स्थापना appeared first on पुढारी.