नाशिक : कंटेनर चालकाला बेशुद्ध करून लूट करणारी टोळी जेरबंद

कंटेनर www.pudhari.news

नाशिक (घोटी/इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
कंटेनर व बिअर बॉक्स लूटमार करणारी टोळी जेरबंद करून पोलिसांनी 10 आरोपींना गजाआड केले आहे. गुन्ह्यातील वाहनांसह कंटेनर व बिअरचे बॉक्स 24 तासांत हस्तगत करण्यात नाशिक ग्रामिण पोलिसांना यश आले आहे.

या दरोड्याप्रकरणी कंटेनर चालक मोहमद साजिद अबुलजैस शेख (22, रा. आजमगड, उत्तर प्रदेश) याने घोटी पोलिस ठाण्यात 5 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीस बेशुद्ध करून व नाशिक येथील हरसूलजवळ डांबून ठेवत मारहाण केल्याचे म्हटले आहे. यावरून पोलिस यंत्रणे शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा, राज्य उत्पादन शुल्क व पोलिस या संयुक्त कारवाईने मनमाड, नांदगाव येथे बिअरचा शेतामध्ये ठेवलेला साठा व आरोपी दीपक बच्छाव यास ताब्यात घेण्यात आले. सखोल विचारपूस करता नीलेश जगताप हे दुसरे नाव पुढे आले व त्याच्या सांगण्यावरून मनमाड अस्तगाव येथे बिअरच्या बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आला.

दुसर्‍या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नीलेश व त्याचा भाऊ यांना ताब्यात घेऊन गुन्ह्याची कबुली देऊन बरोबर असलेल्या इतर आरोपींची फिर्यादी डांबून ठेवलेल्या ठिकाणाची माहिती मुद्देमाल हा त्र्यंबक, हरसूल येथे वाहतूक करण्यासाठी मदत केलेल्या इतर साथीदारांच्या नावाची माहिती दिली. या गुन्ह्यातील किंगफिशर स्ट्राँग बिअरचे बॉक्स चोरी करण्यासाठी वापरलेला आयशर टेम्पो (एमएच 15 ईजी 8566), पिकअप वाहन (एमएच 15 एचएच, 8566), आर्टिका वाहन(एमएच 04, एफएफ 6351) व पेठ पोलिस स्टेशन हद्दीतून चोरी गेलेला कंटेनर (एमएच 43 बीजी, 5463) असा एकूण 63 लाख 29 हजार 856 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच गुन्हा करणार्‍या 10 आरोपींना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण 1054 बिअर बॉक्स हस्तगत केले. आरोपींना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयित आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या सूचनेनुसार अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, कविता फडतरे यांनी केलेल्या गोपनीय आधारावरील मार्गदर्शन कामगिरीवर स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे, घोटी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर आदींनी वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक शशिकांत गर्जे, उपनिरीक्षक सुनील देशमुख यांच्या सहकार्याने दरोड्यातील आरोपींसह मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस अधीक्षक उमाप यांनी कारवाईत सहभागी पोलिस अधिकारी, अंमलदारांना 15 हजारांचे बक्षीस जाहीर केले.

अटक केलेले संशयित आरोपी असे…
नीलेश विनायक जगताप (35), आकाश ऊर्फ सोनू विनायक जगताप (32, दोघे रा. भारतभूषण सोसायटी, प्लॉट न. 44, पवारवाडी, जेलरोड), चेतन अशोक बिरारी (32, रा. जे. के. इनक्लु फ्लॅट नं. 104 आर.टी.ओ. ऑफिसजवळ, पंचवटी), दीपक शिवाजी बच्छाव (31), महेश शिवाजी बच्छाव (28, दोघे रा.घर नं. 155, त्रिमूर्तीनगर, हिरावाडी पंचवटी), विकास ऊर्फ विकी भीमराव उजगरे (26, रा. बिल्डिंग नंबर बी 4, रूम नं. डी 60, घरकुल चिंचोळे शिवार, अंबड), धीरज रमेश सानप (30, रा. स्वप्नपूर्ती अपार्टमेंट, फ्लॅट नं. 302, मानसे कम्पाउंड, मनमाड), गणेश निंबा कासार (38, रा. घर नं. 595, मुक्तांगण गार्डन, मनमाड), मनोज ऊर्फ पप्पू शांताराम पाटील (32. रा. एनएलए 6-42/1 गणेश चौक, सिडको).

मुंबईकडील गुन्हेगार तसेच डोंगराच्या कुशीत लपण्यास व अवैध धंदे करण्यासाठी आरोपी वापर करतात. यापुढे पोलिस यंत्रणा गतिमान करून सीमारेषांवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुन्हेगारी व अवैध धंदे मुळासकट नष्ट केली जाऊन पोलिस व नागरिकांचे हित जोपासले जाईल. – शहाजी उमाप, अधीक्षक नाशिक ग्रामीण पोलिस.

हेही वाचा:

The post नाशिक : कंटेनर चालकाला बेशुद्ध करून लूट करणारी टोळी जेरबंद appeared first on पुढारी.