नाशिक : कळवण रुग्णालयातील रुग्णांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती; शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव

कळवण; पुढारी वृत्तसेवा : कळवण उपजिल्हा रुग्णालयातील महिला रुग्णांच्या वार्डात स्वच्छता गृहात पाणीच नसल्याने आदिवासी महिला रूग्णांचे हाल होत आहेत. पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाबाहेर भटकंती करून पाणी आणावे लागत आहे. रुग्णांची होणारी हेळसांड जिल्हा शल्यचिकित्सकांनी लक्ष घालून थांबवावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे.

कळवण हा आदिवासी बहुल भाग आहे. माजी आदिवासी विकास मंत्री पवार यांनी आदिवासी जनतेची अडचण ओळखून शंभर खाटांची निर्मिती केली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कोविड काळात रुग्णांचे ऑक्सिजनविना झालेले हाल ओळखून येथे सुधारणा करीत ऑक्सिजन प्लान्ट उभारला आहे. तसेच एसएनसीयु युनिटही सुरु झाले आहे. त्यानंतर आता ६ कोटी ४१ लाखांचे कोविड फिल्ड हॉस्पिटल बांधण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुधारणा सुरु आहेत. या उपजिल्हा रुग्णालयात कळवण, सुरगाणा, सटाणा, देवळा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातूनही आदिवासी, बिगर आदिवासी रुग्ण उपचारासाठी येत असतात. असे असताना उपजिल्हा रुग्णलयाच्या हलगर्जीपणामुळे व येथील काही कर्मचाऱ्यांच्या मुजोरीमुळे रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या कळवण तालुक्यात सूर्य आग ओकत असून उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. असे असतांना रुग्णालयाच्या स्वच्छता गृहात पाणीच नसल्याने महिला रुग्णांचे हाल होत आहे. तसेच पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयाबाहेर हॉटेल्स व मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. बाहेरील अस्वच्छ पाणी पिल्याने त्यांचे आजार बळावण्याची भीती नातेवाईकांना सतावत आहे. कळवण हा पाणीदार तालुका म्हणून राज्यात ओळख आहे. कळवण नगर पंचायत मार्फतही नियमित मुबलक पाणी पुरवठा सुरु असताना कळवण उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका आदिवासी रुग्णांना बसत आहे. पिण्याचे पाणीच नसल्याने आदिवासी रुग्णांचे हाल होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन येथील भोंगळ कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव यांनी केली आहे.

माजी पत्नी डिलेव्हरी झाली आहे. चार दिवसापासून येथील महिला कक्षातील स्वच्छता गृहात पाणीच येत नसल्याने महिलांचे हाल होत आहेत. तसेच येथे पिण्याच्या पाण्यासाठी बसविलेले फिल्टर मशीन पाण्याअभावी शोभेचे बाहुले बनले आहेत. रुग्णालयाबाहेरून विकत अथवा मिळेल त्या ठिकाणाहून पाणी आणावे लागत आहे. रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पिण्याचे पाणी उपलब्ध करावे.

जाणूनबुजून दुर्लक्ष

रुग्णालयात रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. याबाबत प्रशासनाकडे कोणी तक्रार करावयास गेले असता. त्यांच्या रुग्णाकडे उपचारबाबत दुर्लक्ष केले जाते. त्यांचे अतोनात हाल होतात. त्यामुळे इतर आदिवासी गरीब नागरिक रुग्णालयाची मनमानी निमूटपणे सहन करण्याची नामुष्की येथे दाखल रुग्ण व नातेवाईकांवर आली आहे. लोकप्रतिनीच्या वशिल्याने दाखल रुग्णांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. त्यामुळे गरीब माणसाने तक्रार केल्यास त्यास या लोकप्रतिनिंच्या रोषाचा सामना करावा लागतो. त्यामुळे दलाली करणाऱ्या लोकप्रतिनी व संजसेवकांचाही बंदोबस्त व्हावा अशी मागणी आदिवासी नागरिकांनी केली आहे.

यापूर्वीही उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी झाल्या आहेत. ते सोयीनुसार आठवड्यातून दोनतीन दिवस उपलब्ध असतात. ह्या अडचणी नित्याच्या झालेल्या असताना रणरणत्या उन्हात रुग्णांना पिण्यासाठी पाणी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. या रुग्णालयाला कागदावरच पुरस्कार दिले जातात का ? असे म्हणण्याची वेळ आली आहे.

The post नाशिक : कळवण रुग्णालयातील रुग्णांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती; शिवसेना तालुकाप्रमुख अंबादास जाधव appeared first on पुढारी.