नाशिक : गौळाणेत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भिती

बिबट्या

सिडको; पुढारी वृत्तसेवा : शहरात काही दिवसांपूर्वी बिबट्याने दर्शन दिल्यानंतर मनपा हद्दीचे शेवटचे टोक असलेल्या गौळाणे गावात बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भिती पसरली आहे. विशेष म्हणजे सव्वा महिण्यात एकाच बंगल्याच्या आवारात बिबट्याने दर्शन दिल्याने अधिक काळजी वाढली आहे. वनविभागाने या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी केली.

गौळाणे गावातील शांताराम चुंभळे यांच्या बंगल्यात मंगळवारी रात्री १ वाजेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश केला.  या वेळी झालेल्या आवाजाने  चुंभळे परिवार जागे झाले आणि खिडकीतून बाहेर पाहिले असता बिबट्याचे दर्शन झाले. या वेळी बिबट्याचा बंगल्यातील परिसरात फिरतानचा वावर सीसीटीव्हीत कैद झाला आहे विशेष म्हणजे याच बंगल्यात दि.२६ जुन रोजी बिबट्याने प्रवेश केला होता. त्या वेळी बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून जखमी केले होते. बिबट्याने रात्रीच्या वेळी या गावातील बहुतांश नागरिकांचे पाळीव कुत्रे खाल्ले आहेत. नागरिकांनी घाबरू नये व सतर्कता बाळगावी तसेच फिरताना खबरदारी घ्यावी. शिवाय रात्री उशिरा एकट्याने बाहेर फिरू नये असे आवाहन वनाधिकारी विवेक भदाणे यांनी केले आहे. वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा उभारावा, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे व कैलास चुंभळे यांनी केली आहे.

The post नाशिक : गौळाणेत बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भिती appeared first on पुढारी.