नाशिक : टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांकडून निषेध; कमी भावामुळे शेतकरी संतापले

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : विविध संकटांचा सामना करत मेहनतीने पिकवलेल्या टोमॅटोला अवघा दोन रुपये किलो तर प्रति क्रेट ४० ते ६० रुपये दर मिळत असल्याने व यातून उत्पादन व वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने बाजार समितीतच टोमॅटो ओतून देण्याची वेळ बळीराजावर आली आहे. टेम्पोभर माल विक्रीसाठी आणूनही शेतकऱ्यांना रिकाम्या हाती माघारी फिरावे लागत आहे. यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर व बाजार समिती आवारात फेकुन देत निषेध व्यक्त केला.

भर उन्हाळा तसेच अवकाळी पाऊस, वातावरणातील होत असलेले बदल यामुळे औषधाचा वाढणारा खर्च तसेच बाजारात टोमॅटोला लागणारी मजुरी, वाहतुकीचा खर्च हे सर्व करूनही टोमॅटोला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने बळीराजा हताश झाला आहे. नाशिक बाजार समितीत गुजरात, पंजाब, राजस्थान, बंगळुरू, दिल्लीस माल जात असतो. तेथून येणारी मागणी घटल्याने आता तेही जाणे बंद झाल्याने व मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

गतवर्षी उच्चांकी दर मिळाल्याने यंदा अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली. त्यामुळे बाजारात टोमॅटोची आवक वाढली. तसेच परराज्यातील टोमॅटोला असलेली मागणी हि यावर्षी घाटली. त्यामुळे बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या टोमॅटोला प्रति क्रेट (२० किलो) ४० ते ६० रुपये दर मिळत आहे. यामुळे वैतागलेल्या शेतकरी अक्षरशः हताश झाला आहे.

नाशिक बाजार समितीत सटाणा, दिंडोरी, कळवण, वणी, गिरणारे, सिन्नर, नायगाव, बाभळेश्वर, म्हाळुंगी या भागातून दैनंदिन दहा ते बारा हजार क्रेट टोमॅटो माल विक्रीसाठी दाखल होत आहे. मात्र योग्य भाव मिळत नसल्याने व शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी माल बाजार समितीच्या आवारात व रस्त्यावर फेकून निषेध नोंदवला.

गेल्यावर्षी टोमॅटो मालाला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली. यामुळे उत्पादन ही वाढले. मात्र परराज्यातील मालाची मागणी घटल्याने दर कमी झाले असून माल फेकून देण्याची वेळ आली आहे. मी स्वतः दोनशे क्रेट टोमॅटो आणलेला होता. मात्र उत्पादन खर्च, गाडी भाडे, मजुरी, हमाली याचे पैसे देखील बाजार भावातून मिळत नाही.
सागर सोनवणे, शेतकरी, सटाणा

बाजार समितीच्या आवारात यावर्षी उन्हाळ्यात टोमॅटोची अवाक वाढल्याने तसेच इतर बाजारपेठत टोमॅटोची मागणी नाही. त्यामुळे व्यापारी देखील टोमॅटो खरेदी करून काय करतील. शेत मालाला भाव न देण्यामागे व्यापाऱ्यांचा कोणताही फायदा नाही.

The post नाशिक : टोमॅटो रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांकडून निषेध; कमी भावामुळे शेतकरी संतापले appeared first on पुढारी.