नाशिक : पहिल्या महिला पोलिस ‘आयर्नमॅन’ चे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत

www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पहिल्या महिला पोलिस ‘आयर्नमॅन’चा किताब पटकावून कझाकिस्तानमध्ये भारताचा तिरंगा फडकाविणा-या नाशिक पोलीस दलातील सुवर्णकन्येचे शुक्रवारी (दि.१९) नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर असेली आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून महाराष्ट्र पोलिस दलातील पहिल्या महिल्या ‘आयर्नमॅन’ होण्याचा विक्रम नाशिकच्या पोलिस नाईक अश्विनी देवरे यांनी नोंदवला आहे. कझाकिस्तानमध्ये झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत अश्विनी देवरे यांनी विक्रमी कामगिरी करत तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकाविला. यानिमित्ताने नाशिकसह देशभरात त्यांचे स्वागत केले जात आहे. शुक्रवारी सकाळी नाशिकरोड रेल्वस्थानकावर त्यांचे आगमन झाले. यावेळी नाशिककरांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी परिवारासह त्यांचे चाहतेही मोठ्या उत्सुकतेने याठिकाणी उपस्थित होते. रेल्वेस्थानकावर झालेल्या स्वागतानंतर नाशिकरोड पोलीस ठाण्यासह पोलीस आयुक्तालयातही अश्विनी देवरे यांचा सत्कार करण्यात आला. नाशिकरोड छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल येथे वाद्यांच्या गजरात आईवडिलांसह त्यांचे पुष्पहार घालून जल्लोषात स्वागत करण्यात आले. वाद्याच्या तालावर ठेका धरत पोलीस कर्मचारी आणि नाशिक सायकलिस्टच्या सदस्यांनी देवरे यांच्यासोबत फुगड्या  घालून आनंद व्यक्त केला.

आजवर 40 सुवर्णपदकांना गवसणी
पोलिस खात्यातील कर्तव्य बजावत असताना अश्विनी यांनी श्रीलंका, मलेशिया तसेच भारतातील अनेक मॅरेथॉन स्पर्धांत यशस्वीरीत्या सहभाग नोंदवून 40 सुवर्णपदकांना गवसणी घातल्याने त्यांच्यावर सर्वस्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये 21 रौप्य, 28 कांस्यपदके कमावली आहेत. आता आर्यनमॅन स्पर्धेतही बाजी मारून महाराष्ट्र पोलिस खात्याच्या शिरपेचात मानाचा सुवर्णतुरा त्यांनी खोवला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : पहिल्या महिला पोलिस ‘आयर्नमॅन’ चे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत appeared first on पुढारी.