नाशिक : मनपाकडे 11 दिवसांत साडेआठ कोटींचा भरणा

नाशिक महापालिका लोगो www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मालमत्ता करवसुलीसाठी महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळे फंडे राबविले जात आहेत. आता महापालिकेने चालू महिन्याच्या 1 तारखेपासून सवलत योजना जाहीर केली असून, अवघ्या 11 दिवसांतच तब्बल 46 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी योजनेचा लाभ घेत आठ कोटी 33 लाख 17 हजार 555 रुपये इतका भरणा केला आहे.

नाशिक पूर्व विभागात सर्वाधिक एक कोटी 75 लाख 77 हजार 530 रुपये जमा झाले आहेत. सवलत योजनेचा लाभ घेण्यात नवीन नाशिक आघाडीवर असून, 12 हजार नागरिकांनी मालमत्ताकर भरला आहे. पुढील 20 दिवस आठ टक्के सवलत कायम राहणार असून, लाभार्थ्यांचा आकडा आणखी वाढणार आहे. महापालिकेच्या उत्पन्नात मालमत्ताकर महत्त्वाचे साधन आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी चालू 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कर संकलन विभागाला 205 कोटी मालमत्ताकरवसुलीचे उद्दिष्ट दिले आहे. गेल्या वर्षी अखेरच्या टप्प्यात जोरदार बॅटिंग करत करसंकलन विभागाने विक्रमी मालमत्ताकर वसूल केला होता. नागरिकांनी वेळेवर कर भरावा यासाठी महापालिकेकडून कर सवलत योजना राबवली जाते. त्यानुसार एप्रिल महिन्यात कर भरल्यास एकूण बिलाच्या पाच टक्के, मे महिन्यात तीन, तर जून महिन्यात भरणा केल्यास दोन टक्के सूट दिली जाते. यंदा तर एप्रिल महिन्यात बिल भरल्यास पाचवरून आठ टक्क्यांपर्यंत सूट वाढविण्यात आली आहे. तसेच ऑनलाइन भरणा केल्यास 10 टक्के सवलत देण्यात आली आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त आणि कर विभाग उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कर विभागातील कर्मचारी आणि सहा विभागीय अधिकारी या सर्वांनी मिळून सातत्याने वसुली मोहीम राबवून उद्दिष्ट पूर्ण केले आहे. आता सन 2023-2024 या वर्षाच्या सुरुवातीलाही मनपाने करांमध्ये सूट दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि कर विभागाच्या उपआयुक्त अर्चना तांबे यांनी केले आहे. सवलत योजनेची माहिती व जनजागृतीसाठी शहर परिसरात रिक्षाद्वारे प्रबोधन केले जात आहे.

संदर्भ रुग्णालयाकडून एक कोटीचा भरणा
शासकीय कार्यालयांचा मालमत्ताकर व पाणीपट्टी थकबाकी मनपासाठी डोकेदुखी ठरत आहे. शालिमार येथील संदर्भ रुग्णालयाकडे एक कोटीहून अधिक पाणीपट्टी थकबाकी होती. करसंकलन विभागाने पाठपुरावा केल्याने संदर्भ रुग्णालयानेही एक कोटी रुपयांचा धनादेश देत पाणीपट्टी भरणा केला आहे. यंदा 75 कोटी पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट आहे.

अशी आहे सवलत…
* एप्रिलमध्ये संपूर्ण कराचा भरणा केल्यास मालमत्ताकरावर 8 टक्के सूट
* मेमध्ये संपूर्ण कराचा भरणा केल्यास मालमत्ताकरावर 6 टक्के सूट
* जूनमध्ये संपूर्ण कराचा भरणा केल्यास मालमत्ताकरावर 3 टक्के सूट
* याव्यतिरिक्त ऑनलाइन भरणा केल्यास वरील सवलतीसह संपूर्ण कराचा भरणा केल्यास सर्वसामान्य करात 5 टक्के सूट

विभागनिहाय मालमत्ताकर जमा
सातपूर                     65,17,796
नाशिक पश्चिम            1,60,52,391
नाशिक पूर्व                1,75,77,530
पंचवटी                      1,42,62,406
नवीन नाशिक             1,51,55,464
नाशिकरोड                1,37,51,968
एकूण                        8,33,17,555

हेही वाचा:

The post नाशिक : मनपाकडे 11 दिवसांत साडेआठ कोटींचा भरणा appeared first on पुढारी.