नाशिक मनपात मार्च एण्डिंगची लगबग ; लेखा विभागाकडून सव्वाशे कोटींची बिले सादर

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मार्चअखेरच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत विविध विकास कामांची बिले लेखा व वित्त विभागाकडून लेखा परीक्षण विभागाकडे तपासणीकरता सादर करण्यात आली आहे. जवळपास सव्वाशे कोटींच्या बिलांची तपासणी होऊन मार्चअखेरपर्यंत संबंधित बिलांची देयके मनपाकडून वितरीत केली जाणार आहे.

महापालिकेतील जमा खर्चाच्या ताळेबंदाचे कामकाज मार्च महिन्याच्या सुरूवातीपासूनच सुरू होते. मार्चअखेरपर्यंत लागणाऱ्या खर्चाचा ताळमेळ जमवून आकड्यांची जुळवाजुळव केली जात आहे. मार्चअखेरपर्यंत महापालिकेला विविध विकास कामांपोटी संबंधित मक्तेदार तसेच वेतनापोटी २०० कोटींची बिले चुकती करावी लागणार आहे. त्यात विविध विकास कामांसाठी १५० कोटी तर कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरता ४५ कोटी व विज बिलापोटी पाच कोटींचा खर्चाचा समावेश आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अनेक खर्चांवर तसेच विकास कामांवर बंधने घातली आहेत. त्याचअनुषंगाने आयुक्तांनी अनेक कामे रद्द करून मनपाचे उत्तरदायित्व कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. नगरसेवक व प्रभाग विकासनिधीतील जवळपास अडीचशे कामांसह आवश्यक नसलेल्या कामांना ब्रेक लागल्याने मनपाच्या खर्चात मोठी बचत झाली आहे. पीपीपी तत्वावर मनपाच्या मालमत्ता विकसित करण्याची योजना बारगळल्याने त्यातून मनपाच्या तिजोरीत जमा होणारे अडीचशे कोटी आणि इतर मार्गाने मिळणारा निधी अशा सुमारे ४५० कोटींच्या निधीवर मनपाला पाणी सोडावे लागले आहे. मोठी तुट निर्माण झाल्याने सुधारीत अंदाजपत्रकातून संबंधित बाबी काढून टाकल्याने आता जवळपास ९१ कोटींची तूट निर्माण झालेली आहे. ही तूट भरून काढण्यासह घरपट्टी, पाणीपट्टी, विकास शुल्क यात महसूल वृध्दी करण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. विकासकामांना निधी लागणार असल्याने मनपाकडून थकीत कर जमा करण्यासाठी उपाययाेजना हाती घेण्यात आल्या आहेत.

आकड्यांची जुळवाजुळव सुरू

मार्चअखेरपर्यंत महापालिकेला विकास कामांची बिले अदा करण्याबरोबरच मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन व वीज बिलापोटी २०० कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. यामुळे हा खर्च भागविण्यासाठी मनपाच्या अर्थ व वित्त विभागाकडून आकड्यांची जुळवाजुळव सुरू आहे. दीडशे कोटींपैकी १२५ कोटींची बिले लेखा परीक्षणकडे तपासणीकरता सादर करण्यात आली असून, येत्या दोन दिवसात ही बिले प्राप्त झाल्यानंतर संबंधितांना अदा केली जाणार असून, आणखी २५ कोटींची देयके येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक मनपात मार्च एण्डिंगची लगबग ; लेखा विभागाकडून सव्वाशे कोटींची बिले सादर appeared first on पुढारी.