नाशिक महापालिकेच्या करवसुलीचा टक्का घसरला

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या महापालिकेकडून सर्वाधिक भर करवसुलीवर दिला जात असून, उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सध्या महापालिकेने कर सवलत योजना दिली असून, त्यास एप्रिल महिन्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, मे महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत वसुलीला काहीसा ब्रेक लागल्याचे दिसून आले. गेल्या मे महिन्यात १३ कोटी ७९ लाख वसुली झाली. २९ हजार लाभार्थ्यांनी सहा टक्के सवलतीचा लाभ घेत ४५ लाख ९० हजारांची सूट पदरात पाडली. पण गतवर्षीची आकडेवारी पाहता यंदा वसुलीचा रिव्हर्स गिअर पाहायला मिळत आहे. गतवर्षी मे महिन्यात सवलत योजनेचा लाभ घेत तब्बल २५ कोटींचा भरणा झाला होता. यंदा मात्र, त्यास ब्रेक लागला.

महापालिका आयुक्तांनी नाशिककरांवर नवीन करवाढ लादणे टाळत कसवसुलीवर अधिक भर देण्याच्या सुचना केल्या आहेत. मनपा प्रशासनाकडून दरवर्षी करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत बिल भरणा केल्यावर विशिष्ट सूट दिली जाते. यंदा एप्रिल महिन्यात कर अदा केल्यास एकूण रकमेवर नेहमीच्या पाच ऐवजी आठ टक्के सूट देण्यात आली. त्यास नाशिककरांनी बंपर प्रतिसाद दिला. तब्बल एक लाखाहून अधिक नागरिकांनी ५२ कोटींचा भरणा केला. गतवर्षी त्याच कालावधीत हा आकडा २९ कोटी इतका होत‍ा. यंदा एप्रिल महिन्यात तब्बल २२ कोटी मालमत्ता करवसुली सरप्लस पाहायला मिळाली. मे महिन्यात तीन टक्के सवलत दिली जाते. यंदा ती सहा टक्के करण्यात आली. पण एप्रिलच्या तुलनेत काहीसा थंड प्रतिसाद मिळाला. २९ हजार नागरिकांनी करभरणा करत सहा टक्के सूटची संधी साधली. मे महिन्यात 13 कोटी ७९ लाख मालमत्ता कर नागरिकांनी भरला. नवीन नाशिकमधील नागरिक करसवलत घेण्यात आघाडीवर असून त्यांनी दोन कोटी ९२ लाखांचा भरणा केल‍ा. त्या खालोखाल नाशिकरोड विभागाचा क्रमांक लागतो. पण गतवर्षी मे महिन्यात तब्बल 25 कोटी भरणा झाला होता. गतवेळेच्या तुलनेत यंदा वसुलीत 11 कोटींची घट पाहायला मिळत आहे. दरम्यान, चालू जून महिन्यातही करसवलत योजना सुरू असून एकूण रकमेवर तीन टक्के सूट मिळवता येणार असल्याने, अधिकाधिक ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.

विभागातील मे महिन्यातील वसुली

विभाग                 वसुली                     रुपये

सातपूर               ३,४४३                १ कोटी ५८ लाख

नाशिक पश्चिम    ३,०७५                १ कोटी ९८ लाख

नाशिक पूर्व         ५,०२५                 २ कोटी १० लाख

पंचवटी                ४,८७८                २ कोटी ३३ लाख

नवीन नाशिक      ५,७४१                 २ कोटी ९२ लाख

नाशिकरोड          ६,९९०                 २ कोटी ८५ लाख

हेही वाचा:

The post नाशिक महापालिकेच्या करवसुलीचा टक्का घसरला appeared first on पुढारी.