नाशिक : ‘मोसम’ला दुसरा पूर, बैलजोडी गेली वाहून

mosam nadi www.pudhari.news

नाशिक (मालेगाव/सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
बागलाण तालुक्यातील मोसम खोर्‍यात आणि मालेगाव तालुक्यातील अजंग, वडनेर, करंजगव्हाण मंडळात सोमवारी (दि. 8) सायंकाळी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे मोसम नदीला हंगामातील दुसरा मोठा पूर गेला. शहरातील द्याने फरशी आणि सांडवा पूल पाण्याखाली गेला होता. अतिक्रमित किल्ला झोपडपट्टी तसेच चावचावनगरमध्ये पाणी शिरले आणि गाळणेत बैलजोडी वाहून केली.

तहसीलदार सी. आर. राजपूत आणि मनपा आयुक्त तथा प्रशासक भालचंद्र गोसावी यांनी रात्री पूरस्थितीची पाहणी करीत उपाययोजनांचा आढावा घेतला. सोमवारी दुपारनंतरच बागलाण व मालेगाव तालुक्यांत सर्वदूर पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास बागलाणमधील श्रीपुरवडे, ब्राह्मणपाडेसह काही ठिकाणी ढगफुटीसदृश बरसात झाली. त्यामुळे शेतशिवारातील पाणी बांध तोडून जवळपासच्या ओहोळ, नाल्यांना आणि नद्यांना येऊन मिळाले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांनंतर प्रथमच नदी नाले व ओहोळ दुथडी भरून वाहिले. हे सर्व पाणी पुढे जाऊन एकत्रितरीत्या मोसम नदीला मिळाले. हरणबारी परिसरातील पावसामुळेही या नदीपात्रात आधीच पाणी वाहात असताना, त्यात या पाण्याची भर पडली. त्यामुळे मोसम नदीपात्रातदेखील पाण्याचा फुगवटा तयार होऊन ते गिरणा धरणाच्या दिशेने झेपावले. परिणामी, हंगामातील दुसरा मोठा पूर मोसमला गेला. त्यात द्याने फरशी पूल आणि सांडवा पूल पाण्याखाली गेला. रामसेतू पुलालाही खालून पाणी लागले होते. अचानक आलेल्या पुराने नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमधील नागरिकांची तारांबळ उडाली. मनपा प्रशासनाने तत्काळ अग्निशमन दलाच्या माध्यमातून नागरिकांचा सूचना दिली. काही कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. तहसीलदार राजपूत व आयुक्त गोसावी यांनी मध्यरात्रीपर्यंत नदीकाठावर पाहणी केली.

मालेगाव तालुक्यातील सोमवारचे पर्जन्यमान :

मालेगाव          28 मिमी कौळाने नि. 14 मिमी
दाभाडी           21 मिमी जळगाव नि. 12 मिमी
अजंग             28 मिमी सौंदाणे 00
वडनेर            57 मिमी सायने 15 मिमी
करंजगव्हाण    53 मिमी निमगाव 15 मिमी
झोडगे            50 मिमी एकूण 331 मिमी
कळवाडी       38 मिमी एकूण सरासरी 408.49

हेही वाचा:

The post नाशिक : ‘मोसम’ला दुसरा पूर, बैलजोडी गेली वाहून appeared first on पुढारी.