नाशिक : राज्यातील २० फुटबॉलपटूंना मिळणार जर्मनीत प्रशिक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्रामध्ये फुटबॉल या खेळाचा विकास व प्रसारासाठी राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने म्युनिकच्या फुटबॉल क्लब बायर्नसोबत करारनामा केला आहे. या करारांतर्गत एफ. सी. बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील निवडक २० खेळाडूंच्या प्रवासासह निवास व प्रशिक्षणाचा खर्च शासनाकडून करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातून २० खेळाडू जर्मनी येथे प्रशिक्षणासाठी जाण्यासह क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच जिल्हा क्रीडा परिषद व नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर करण्यात येणार आहे. या फुटबॉल स्पर्धा 14 वर्षाखालील मुलांच्या गटात घेण्यात येतील. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी मुलांची जन्मतारीख ही १ जानेवारी 2009 नंतरची असावी. जिल्हास्तरावरील स्पर्धेचे आयोजन ८ फेब्रुवारीपासून हिरावाडीतील विभागीय क्रीडा संकुल ये‌थे रंगणार आहे. दरम्यान, जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन, आपल्या शाळेच्या संघाची नोंदणी संघातील खेळणाऱ्या 20 खेळाडूंच्या नावांच्या यादीसह ५ फेब्रुवारीपूर्वी जमा करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

फुटबॉल क्लब बायर्न हा जागतिक अग्रगण्य क्लबपैकी एक आहे. या करारामुळे खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण व क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबद्ध प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी चालना मिळेल. – अविनाश टिळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक.

अशी होणार खेळाडूंची निवड..
जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजयी संघ २० ते २८ फेब्रुवारी या कालावधीमध्ये होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. तर विभागीय स्तरावर विजयी झालेले संघ हे 7 ते 9 मार्च या कालावधीत शिवछत्रपती क्रीडापीठ येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. या स्पर्धेतून जर्मनीसाठी अंतिम 20 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : राज्यातील २० फुटबॉलपटूंना मिळणार जर्मनीत प्रशिक्षण appeared first on पुढारी.