नाशिक : वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर महावितरणची दंडात्मक कारवाई

वीजचोरी www.pudhari.news

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : चांदवड तालुक्यात वीज वितरण कंपनीची चोरी करणाऱ्या बहादरांवर कारवाई करण्यास वीज वितरण कंपनीने सुरुवात केली आहे. या कारवाईत चांदवड, धुळे व नाशिक येथील पथकाने ६ लाख २० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती चांदवडचे उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील यांनी दिली.

चांदवड शहर व ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीकडून विजेचा पुरवठा केला जातो. या विजेचा काही नागरिक कनेक्शन न घेता विजेची चोरी करतात. या चोरी बहादरांवर कारवाई करण्यासाठी व वीज चोरीला आळा बसण्यासाठी महावितरण कंपनीने भरारी पथक नेमले आहे. नाशिक ग्रामीण येथील भरारी पथकाने चांदवड शहरी भागात धडक कार्यवाही करीत एका नागरिकावर ६० हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. तर धुळे येथील भरारी पथकाने चांदवड शहरातील वीज चोरी करणाऱ्या ग्राहकावर कारवाई करीत तब्बल ५ लाख रुपयांचा दंड आकारला आहे.

चांदवड विभागाचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी यांच्या मार्गदर्शन अंतर्गत आणि चांदवड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील यांच्या नेतृत्वात उपविभागातील कर्मचारी आणि कक्ष अभियंता गौरव गायकवाड यांसह कक्ष कर्मचारी यांनी १० ते १२ ठिकाणी वीज चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करीत ७० ते ८० हजार रुपयांची वसुली केली आहे. एका महिन्याभरात चांदवड उपविभागातील १२ कक्ष कार्यालयामार्फत ३० ते ४० ठिकाणी वीज चोरी पकडण्यात आलेली असून सदर ग्राहकांकडून दंडात्मक रक्कम वसूल करणे कामी कार्यवाही सुरु आहे. या पुढे ही वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर महावितरण, चांदवड मार्फत वीज चोरीला प्रतिबंध करणे कामी कार्यवाही सुरु राहणार असल्याचे उपकार्यकारी अभियंता उमेश पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : वीज चोरी करणाऱ्या नागरिकांवर महावितरणची दंडात्मक कारवाई appeared first on पुढारी.