नाशिक : ‘स्मार्ट सिटी कंपनी’ चलेजाव; काँग्रेसने छेडले आंदोलन

काँग्रेस आंदोलन www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहर काँग्रेसतर्फे शालिमार चौकात शनिवारी (दि.24) स्मार्ट सिटीविरोधात चलेजावचा नारा देत आंदोलन करण्यात आले. स्मार्ट सिटी चलेजाव, स्मार्ट सिटी मुर्दाबाद, स्मार्ट सिटीच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी झालीच पाहिजे, अशा विविध घोषणा देण्यात आल्या.

स्मार्ट सिटीच्या भोंगळ कारभाराचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल यांनी वाभाडे काढले. त्यांनी सांगितले की, नाशिक शहरात स्मार्ट सिटी कंपनीने नियोजनशून्य कारभार चालवला आहे. संपूर्ण शहरातील व गावठाणातील चांगले रस्ते खोदण्यात आले. खड्ड्यांचे शहर म्हणून ओळख निर्माण होते की काय, अशी स्थिती आहे. रस्ता खोदताना पाणी, वीज, गटार या सर्व वाहिन्या नादुरुस्त करून ठेवलेल्या आहेत. अनेक ठिकाणी नादुरुस्त वाहिन्या दुरुस्त न करता रस्ते तसेच बुजवण्यात आले आहेत. अनेक नागरिक अपघातग्रस्त झाले असून, काहींना अपंगत्व आले आहे. काही विजेच्या धक्क्याने व अपघाताने मृत्युमुखी पडले. हा एक प्रकारे स्मार्ट सिटी कंपनीने खूनच केल्याचा आरोप बागूल यांनी यावेळी केला. कंपनीने किंवा महापालिकेने जबाबदारी तर सोडाच पण हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते आहे. सुंदर नाशिकचे विद्रूपीकरण कंपनीकडून सुरू आहे. कामात भ्रष्टाचार झाला असून, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेसतर्फे करण्यात आली. यावेळी अध्यक्ष शरद आहेर यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात सुरेश मारू, वसंत ठाकूर, ज्ञानेश्वर काळे, शरद बोडके, विजय पाटील, नरेश पारख, नरेश कटारिया, विश्वास काळे, ईशाक कुरेशी, रौफ कोकणी, अनिल बहोत, हनिफ बशीर, कैलास कडलग, बाबा खैरनार, साहील खान, वसंत मनियार, अशोक शेंडगे, अल्ताफ सय्यद, राकेश चौधरी, बापू सूर्यवंशी, रईस शेख, सिद्धेश बागूल, शहानवाज आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘स्मार्ट सिटी कंपनी’ चलेजाव; काँग्रेसने छेडले आंदोलन appeared first on पुढारी.