महाराष्ट्रातून गुजरातमध्ये विक्रीसाठी जाणारा मद्यसाठा जप्त; कारचालक फरार

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर पोलिसांनी महाराष्ट्रातून गुजरातमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात येणारा एक लाख ७२ हजारांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. आदिवासी पश्चिम पट्ट्यातील मळगांव शिवारातील कळंबबारीत एका आलिशान कारमधून हा मुद्देमाल जप्त केला. मात्र कारवाई दरम्यान अंधाराचा फायदा घेत कारचालक फरार झाले.

शुक्रवारी (दि.९) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास आंतरराज्य सिमा भागात पेट्रोलिंग सुरू होते. दरम्यान सपोनि सचिन साळुंखे यांना अवैध मद्य तस्करीविषयी गुप्त माहिती मिळाली. नवापूर रोडवरील मळगांव शिवारातील कळंबबारीत हे पेट्रोलिंग सुरु होते. यावेळी (GJ 27 BS 6487) या क्रमांकाची सफेद रंगाची संशयित चारचाकी आढळून आली. या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता कारचालक कार लॉक करुन पळून गेला. पथकाने कारची झाडाझडती घेतली असता या कारच्या मागील सिटवर तसेच डिक्कीत देशी-विदेशी कंपनीचा मद्यसाठा आढळून आला. या कारवाईत १ लाख ७२ हजार २०० रुपये किमतीच्या मद्यसाठ्यासह १० लाखांची क्रेटा कार असा एकूण ११ लाख ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पिंपळनेर पोलिसांना जप्त केला.

याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड,अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी पाटील,यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन साळुंखे,पोसई भाईदास माळचे,असई लक्ष्मण गवळी,पोहेकॉ.कांतीलाल अहिरे,पोहेकॉ.प्रकाश सोनवणे,पोकॉ.राकेश बोरसे,हेकॉ.संदीप पावरा, पोकॉ.पंकज माळी,कैलास कोळी,रविंद्र सूर्यवंशी,पंकज वाघ,नरेंद्र परदेशी,या पथकाने केली. पुढील तपास असई. बी.आर.पिंपळे हे करीत आहेत.

The post महाराष्ट्रातून गुजरातमध्ये विक्रीसाठी जाणारा मद्यसाठा जप्त; कारचालक फरार appeared first on पुढारी.