राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा द्या : शरद पवार

शरद पवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हल्ला केला, भ्रष्टाचाराचे आरोप केले. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, मीच सांगतो, तुमच्या हाती देशाची सत्ता आहे, तुमची सगळी शक्ती वापरा आणि राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला त्याला वाटेल ती शिक्षा करा. आम्ही तुमच्या बरोबर राहू, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले.

राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवारांची पहिलीच सभा शनिवारी येवल्यात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

मी माफी मागण्यासाठी आलो आहे. तसा माझा अंदाज चुकत नाही; पण या ठिकाणी चुकला. मी ज्याचे नाव पुढे केले, त्याला तुम्ही निवडून दिले आहे. त्यामुळे माझे कर्तव्य आहे म्हणून माफी मागायला आलो आहे. माफी मागत असतानाच एक जबाबदारीने सांगतो, मी पुन्हा येईन आणि योग्य विचार सांगेन, असे सांगत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष जोरदार टीकाही केली.

पवार म्हणाले, येवला मतदारसंघाचा इतिहास मोठा आहे. स्वातंत्र्यलढ्यात या येवल्याचे मोठे योगदान आहे. येत्या काळात आम्हाला काहींना शक्ती द्यायची आहे. नव्या जबाबदार्‍या द्यायच्या आहेत. यापूर्वी काही गोष्टी चुकीच्या घडल्या. त्याची दुरुस्ती केली पाहिजे, असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी खासदार अमोल कोल्हे

यांनी, बंडखोरांना खंडोजी खोपडे यांची उपमा देत राहिलेल्या निष्ठावान पदाधिकार्‍यांना कान्होजी जेधे यांची उपमा दिली. ते म्हणाले की, सध्या हे महाभारत सुरू आहे. यात नात्यागोत्यापेक्षा नीती-अनीती, धर्म-अधर्म यांचे युद्ध सुरू आहे. हे महाभारत घडविणारा शकुनीमामा शोधायला हवा. माझ्या हक्कांसाठी माझा बाप लढतोय, हा विश्वास जनतेमध्ये दिसत आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है… पिक्चर अभी बाकी है… असे ते म्हणाले.

खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या आश्वासनांची उदाहरणे देत, त्यातील एकही पूर्ण झाले नाही, अशी टीका केली. आता आपला आमदार आल्यावर पहिला मांजरपाडा प्रकल्प पूर्ण करणार. येवल्यात कंपन्या आणून रोजगार निर्माण करण्यात येतील, असे म्हणत शरद पवार यांना साथ देण्याचे भावनिक आवाहन त्यांनी केले.

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, शरद पवारांना पंतप्रधान, राष्ट्रपती व्हायचे नाही, तर त्यांना सर्वसामान्य कार्यकर्ते यांना आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य बनवायचे आहे, असेे सांगितले. पवारांनी मुंडेंचे घर फोडले, असा आरोप भुजबळ यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना आव्हाड म्हणाले, पंडितअण्णा मुंडे तीनवेळा शरद पवार यांच्याकडे आले होते. मात्र, पवारांनी तिन्ही वेळा त्यांना परत जाण्याचा सल्ला दिला होता. तसेच गोपीनाथ मुंडे यांना संपर्क करून घर सांभाळण्याचा सल्ला दिला होता.

व्यासपीठावर रोहित पवार, अशोक पवार, सुनील भुसारा, नरेंद्र दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, हेमंत टकले हेदेखील उपस्थित होते.

माझ्या वयाचा उल्लेख कराल, तर महागात पडेल

वयाबाबत नेहमीच चर्चा होत आहेत, याबाबत बोलताना तुम्ही वयाच्या भानगडीत पडू नका. विचार आणि कार्यक्रमाची चिंता करा, वयाची करू नका, असे सांगतानाच वयाचा उल्लेख केला, तर महागात पडेल. काहींना लवकरच किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही पवार यांनी यावेळी दिला.

The post राष्ट्रवादीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांना शिक्षा द्या : शरद पवार appeared first on पुढारी.