वाचाल तर वाचाल : पोलिस आयुक्त अंकुश शिंदे

नाशिक : गौरव अहिरे

ज्याप्रमाणे शरीरास अन्न, पाणी, व्यायामाची गरज आहे, तसेच मेंदुला खाद्य म्हणून नाविण्याची, विचारांची गरज असते. त्यासाठी प्रत्येकाने वाचन करणे गरजेचे आहे. वेळ मिळेल तसे वाचन केले पाहिजे. वाचायला येत असताना कोणत्याही प्रकारचे वाचन न करणे म्हणजे अशिक्षीतपणा वाटतो. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्या सोयीनुसार वाचनाची गोडी जपली पाहिजे. मला देखील वाचनाची आवड माझ्या वडिलांकडून मिळाली. वडिल खुप वाचन करायचे, त्यांच्याकडील पुस्तके, जुनी वृत्तपत्रे वाचून आम्ही मोठे झाल्याचे अनुभव पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.

शहरातील कायदा व सुव्यवस्थेची महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळताना शिंदे त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून वाचनाची आवड जोपासत असतात. शिंदे यांनी सांगितले की, सकाळी, प्रवास करताना, झोपण्याच्या अगोदर ते वाचन करतात. सामाजिक, वैज्ञानिक संशोधन करून मानवी, जीवन, मन, समाज, पर्यावरण, प्रयोगांवर लिहलेली पुस्तके व विज्ञान विषयक पुस्तके वाचण्यास त्यांना आवडतात. वाचनामुळे आयुष्य घडते. पुस्तके लिहण्यासाठी लेखक त्यांचे आयुष्य खर्ची करतात. त्यामुळे पुस्तकात भाषणापेक्षा जास्त माहिती असते. पुस्तक वाचन केल्यानंतर त्यावर विचार केल्यास आपल्या वैचारिक, सामाजिक जाणीवांमध्ये आमुलाग्र बदल होतो. वाचनामुळे पोलिस खात्यात काम करताना तेथे नेतृत्व म्हणून व एकसंघ काम करताना खुप फायदा झाला, असेही शिंदे यांनी सांगितले.

सध्याच्या जमान्यात डिजीटल माध्यमे, सोशल मीडियावर विविध विषयांवर लिखान असते. मात्र मोघम माहितीच्या आधारे ते लिखान असल्याने अनेक लोक त्यावरून स्वत:चे मत बनवतात. हे मत बऱ्याचदा चुकीचे किंवा अयोग्य असू शकते. वाचनामुळे स्वत:च्या व्यक्तीमत्वात बदल होतो, आत्मविश्वास वाढतो, सामाजिक जाणिवांमध्ये बदल होतो. त्यामुळे तरुणाईने वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचावी. नाही तर ‘वाचता येणे याचा काय फायदा?’ असा प्रश्नही पोलिस आयुक्त शिंदे विचारतात. पुस्तके वाचताना भाषेचा अडसर येत नाही. ज्या भाषेतील पुस्तके वाचन करायला, समजून घ्यायला सोपी जातात त्या भाषेतील पुस्तके वाचावीत. त्याचप्रमाणे त्यांना इंटरनेट, मोबाइलऐवजी पुस्तके वाचण्यास आवडत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

The post वाचाल तर वाचाल : पोलिस आयुक्त अंकुश शिंदे appeared first on पुढारी.